मराठा आरक्षणाच्या बाबतीत आमचा संयम तोडायला लावू नका, अन्यथा आम्ही तलवारीही हातात घेऊ: छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा
मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला आज (शुक्रवारी) तुळजापूर येथे सुरुवात झाली. याप्रसंगी खासदार संभाजीराजे भोसले उपस्थित होते.
राम जळकोटे -उस्मानाबाद
मराठा आरक्षणाच्या बाबतीत आमचा संयम तोडायला लावू नका, अन्यथा आम्ही तलवारीही हातात घेऊ, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. मराठा क्रांती मोर्चाने जागरण गोंधळ घालून तुळजापूर ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला सुरुवात केली. यावेळी संभाजीराजे छत्रपती बोलत होते.
खासदार छत्रपती संभाजीराजे तुळजापूर येथे संबोधित करताना.ते म्हणाले, आपण जाळपोळ न करता आंदोलन करावे. सरकारने या आंदोलनाची दखल घ्यावी. अन्यथा आम्ही देखील कायदा हातात घ्याला मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच ज्यांना आंबेडकर कळलेच नाहीत, तेच लोक मराठा आरक्षणाला कोर्टात जाऊन विरोध करत आहेत, अशी टीका त्यांनी गुणरत्न सदावर्ते आणि प्रकाश आंबेडकर यांचे थेट नाव न घेता केली.सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजातील लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे हा मुद्दा पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी तसेच एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, या आग्रही मागण्यांसाठी शनिवारी 10 ऑक्टोबरला मराठा आरक्षण संघर्ष समितीने पुकारलेला महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला आहे. तर मराठा समाजाच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत.