ऊसतोड कामगार व वाहतूकदार यांची शरद पवार यांच्या सोबत बैठक
मिलिंद लोहार -पुणे
ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन १९ टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील.
या बैठकीदरम्यान स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाद्वारे ऊसतोड कामगारांच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करण्यात आले. महामंडळ नोंदणी लवकर पूर्ण करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत निर्देश देण्यात आले. ऊसतोड कामगारांची नोंदणी, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, कामगार महिलांसाठी आरोग्य योजना, कामगारांसाठी विमा योजना, यांसह विविध बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.