हृदय पिळवटून टाकणारा तो भगत कुटुंबाचा आक्रोश
निरागसतेचा क्रूर अंत
निष्पाप जीवाबरोबर माणुसकीही मेली
मिलिंदा पवार- खटाव सातारा
फक्त सातारा जिल्ह्याला नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी घटना फलटण तालुक्यातील काळज गावी घडली . मंगळवार दि .29 सप्टेंबर ला राहत्या घरातून चि .ओंकार भगत या चिमुकल्याच अपहरण करण्यात आलं होतं .या घटनेने फलटण तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्हा हादरवून सोडला होता .
जिल्हा पोलिस प्रमुख आदरणीय तेजस्विनी सातपुते यांनी तपासाची सर्व सुत्रे हाती घेतली होती .सबंध पोलिस यंत्रणा मागील दोन दिवस रात्रंदिवस तपासात लागली होती त्यांच्या बरोबरच गावातील युवक व स्थानिक प्रशासनाकडुन ओंकार चा युध्दपातळीवर तपास सुरू असतानाच आज सकाळी त्याच्या राहत्या घरा शेजारील विहिरी मध्ये त्या आठ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह पाण्यावर तरंगत्या अवस्थेत दिसला आणि त्या निरागस निष्पाप बाळाचा शोध संपला. ओंकार सापडेल या आशेने राहिलेल्या संपूर्ण भगत परिवाराने ओंकारचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला .हृदय पिळवटून टाकणारा तो भगत कुटुंबाचा आक्रोश पाहून मन सुन्न झाल आणि मनात प्रश्नांच काहूर माजू लागल .
केवढी ही कृरता? आणि किती हा निर्दयीपणा? एक चिमुकला जीव ही झगमगती भव्य दिव्य दुनिया पाहण्या आधिच का संपवला गेला ? एवढ्याशा निष्पाप जीवाला पाण्यात टाकताना या नराधमांना काहीच कसं वाटलं नसेल ? एवढं निर्दयी धाडस आलं कुठून ?
खरंतर हे जे कोणी असतील ना त्यांना माणूस म्हणून जगण्याचा काही एक अधिकार नाही. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा जल्लादी मानसिकता असणाऱ्या त्या नराधमांना पोलिसांनी लवकरात लवकर पकडाव आणि आपल्या न्यायव्यवस्थेन या जल्लादांना फाशीची कठोर शिक्षा द्यावी . तर आणि तरंच ओंकारच्या कुटुंबीयांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल .गेलेला तो निष्पाप जीव पुन्हा येणार नाही परंतु त्याचे मारेकरी मोकाट राहू नयेत एवढीच अपेक्षा नागरिक बोलत होते.