जिल्ह्यातील कांदळवन संवर्धनासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा पुढाकार
वरसोली व मांदाडला 15 हेक्टर जागेत कांदळवन उभारण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला सादर
अमूलकुमार जैन-मुरुड
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे 5 हेक्टर व तळा तालुक्यातील मांदाड येथे 10 हेक्टर अशा 2 ठिकाणी एकूण 15 हेक्टर जागेत कांदळवन उभारण्याच्या दृष्टीने एकूण 52 लक्ष 35 हजार रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संचालकांकडून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प व्यवस्थापकांकडे मंजूरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.
कांदळवनामुळे सागरी अन्न साखळी अधिक मजबूत होते. सुनामी किंवा वादळी वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणावर अडविण्यास मदत होते. जलचर सृष्टीतील विविध जलचरांना (खेकडा विविध प्रकारचे मासे) याबरोबर विविध प्रकारच्या पक्षांनी (बगळे, स्विफ्ट, कावळे, घार, किंगफिशर, हॉर्नबील वगैरे) अन्नसाखळीस पोषक वातावरण यामुळे तयार होते.कांदळवन हे सदाहरीत असते. त्यांची पानगळ होत नाही.
त्याचप्रमाणे खारफुटी हा एक समुद्राजवळ वाढणारा, अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह आहे. खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. हिची मुळे समुद्राच्या पाण्यातले मिठाचे प्रमाण सहन करू शकतात आणि लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप थांबवतात. खाऱ्या जमिनीतही जिची फूट होते ती खारफुटी मराठीत या वनस्पतीला कच्छ वनस्पती असेही म्हणतात. इंग्रजीत मॅंग्रोव्ह.तिवर हा या समूहातील एक उपप्रकार आहे. या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात. भारतामध्ये जगातील सर्वांत जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या गुजरात राज्याची किनारपट्टीची लांबी ही सर्वात जास्त आहे.
त्यानुसार याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरु झाली असून पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनास सविस्तर प्रस्ताव सादर केला व तो प्रस्ताव राज्य शासनाकडून प्रकल्प व्यवस्थापक, राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांना अंतिम मंजूरीकरिता पाठविण्यात आला आहे.
अशाच प्रकारे ठाणे जिल्ह्यातील अर्नाळा, वसई, पालघर व रत्नागिरी जिल्ह्यातील डोकमाळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रामेश्वर तलेरे, मुंगे तलेरे असे एकूण 9 हेक्टरवर कांदळवन उभारण्याच्या दृष्टीने 28 लक्ष 65 हजार 393 रूपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या संचालकांकडून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प व्यवस्थापकांकडे मंजूरीसाठी प्रस्तावित करण्यात आला आहे.