Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

लोकशासन आंदोलन समितीच्या वतीने नागोठणे रिलायन्ससमोर आंदोलनास प्रारंभ ; मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार

 लोकशासन आंदोलन समितीच्या वतीने नागोठणे रिलायन्ससमोर आंदोलनास प्रारंभ ; मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा ठाम निर्धार

 राजेश भिसे-नागोठणे


रिलायन्स व्यवस्थापनाने काही दिवसांपूर्वी २७ नोव्हेंबरला अंतिम निर्णय दिला जाईल या दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्ही आज रोजी येथे जमलो असून दोन तासांत व्यवस्थापन येथे हजर न झाल्यास आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा आम्ही सर्वांनी निर्धार केला असल्याचा इशारा लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड यांनी रिलायन्स व्यवस्थापनाला दिला. 

          येथील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचेवतीने आंदोलन छेडण्यात आले असून त्याचा प्रारंभ आज दुपारी बारा पासून रिलायन्स कंपनीच्या परिसरात करण्यात आला, त्यावेळी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करताना गायकवाड बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांचे अध्यक्षतेखाली समितीच्या वतीने हे आंदोलन चालू झाले असून या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, सुरेश कोकाटे, बळीराम बडे, अनंत फसाळे, प्रशांत शहासने, तेजस  मिणमिणे, जगदीश वाघमारे, सुजित शेलार, प्रमोद कुथे, एकनाथ पाटील, मोहन पाटील, गुलाब शेलार, नीता बडे, उषा बडे, निलेश शेलार, जनार्दन घासे, गौतमी शेलार, रूपा भोईर आदींसह नागोठणे ते चोळे या मार्गातील शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत. निर्णय मिळाल्याशिवाय एकही प्रकल्पग्रस्त येथून आज उठणार नसून तुम्ही काही निर्णय घेणार नसाल, तर आमची पुढची भूमिका आजच स्पष्ट करण्यात येईल, असे राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. शेकडो प्रकल्पग्रस्त आपल्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी झाले असले तरी, छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श असल्याने हे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

आंदोलन चालू झाल्यामुळे कंपनीने आपले मुख्य प्रवेशद्वार बंद केले असल्याने दिवसभरात एकही वाहन कंपनीत जावू शकलेले नाही. खबरदारीची उपाययोजना म्हणून पो.नि. दादासाहेब घुटुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि पोलिसांची प्रचंड अशी फौज तैनात ठेवण्यात आली आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies