श्रीवर्धनमधील अनेक आरोग्य कर्मचारी वेतनापासून वंचित
वरिष्ठ कार्यालयाकडून फक्त तारीख पे तारीख
अमोल चांदोरकर - श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ही नेहमीच कोणत्यातरी कारणांमुळे चर्चेचा विषय बनलेली असते अनेक वेळा सर्वसामान्यांच्या रोषाला कारणीभूत ठरलेली असते.मात्र आता श्रीवर्धनमधील ढिसाळ आरोग्य यंत्रणेचा फटका हा तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी,रुग्णवाहिका चालक यांना बसत आहे.कोरोना काळात अनेक कर्मचाऱ्यांचे सहा ते सात महिन्यांपासूनचे वेतन रखडल्याचे समजले आहे.कोरोना महामारीमुळे राज्यात असलेली टाळेबंदी याचा फटका शासनाच्या महसुलालासुध्दा बसल्याने शासनाचीसुध्दा तिजोरी सध्या रीकामी असल्याची जाणिव प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यांना आहे.परंतु याबाबत अलिबाग येथील कार्यालयात विचारणा केली असता तेथील कार्यालयीन अधिकाऱ्यांकडून मात्र तारीख पे तारीख देत असून कोणत्याही प्रकारची समाधानकारक उत्तरे देत नाहीत
असा आरोप आरोग्य सेवक करीत आहेत.त्यामुळे जर वेळेत वेतन मिळाले नाही तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ शकते.तरी शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करुन आरोग्य कर्मचाऱ्यांनाचे वेतन वेळेत मिळावे यासाठी योग्य ती उपाययोजना तातडीने करावी अशा आपल्या भावना आरोग्य कर्मचाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ व्यक्त केल्या.
रुग्णवाहिका चालक व सफाई कामगार यांच्या रखडलेल्या वेतनाच्या प्रश्ना बाबत अनेक वेळा जिल्ह्यातील कार्यालयात चौकशी केली मात्र कधीच समाधानकारक उत्तरे मिळाली नाही.
अमोल म्हात्रे ,अध्यक्ष ,रुग्णवाहिका चालक संघटना रायगड
दिवाळी काळामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन झाले असून इतर कर्मचाऱ्यांचे राहिलेले वेतन शासकीय फंड येत नसल्याने रखडले आहे या बाबत लवकरच चौकशी करून वेतनाचा विषय मार्गी लावू .
सुधाकर मोरे ,जिल्हा आरोग्य अधिकारी ,रायगड
)