कडधान्याची शेती येतेय बहरास, शेतकऱ्यांना आशेचा किरण !
संतोष सुतार - माणगांव
ऑक्टोबर अखेर अनेक शेतकरी हे भातशेतीची कापणी करून कडधान्याच्या शेतीस सुरुवात करतात. जमिनीच्या ओलसरपणाचा फायदा घेऊन अनेक शेतकरी शेतातून वाल, मटकी, मूग, हरभरे इत्यादी कडधान्याची पिके घेतात. ऑक्टोबरमध्ये सुरुवातीस थांबलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांनी शेतातून कडधान्य पेरली होती. मात्र पुन्हा झालेल्या अवकाळी पावसाने पेरलेली शेती वाया केली गेली. सतत लांबत जाणाऱ्या पावसाने कडधान्य शेतीवरही संकट आले होते. मात्र नोव्हेंबर मध्यात पूर्णतः थांबलेल्या पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी कडधान्य पेरली व योग्य हवामान सुरू झाल्याने सदर कडधान्य बहरू लागल्याचे चित्र शेतातून दिसत आहे. असेच योग्य हवामान राहिल्यास कडधान्य शेतीतून चांगले उत्पादन मिळेल अशी आशा शेतकरी करीत आहेत.
तालुक्यात जवळपास ४५० ते ५०० हेक्टर शेतीवर कडधान्य शेती केली जाते. अनेक शेतकरी या पिकातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळवितात. गावाकडील शेतीतील कडधान्य म्हणून ह्या कडधान्यांना शहरातही चांगली मागणी आहे.
* पावसाने कडधान्य पेरणी लांबली होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याचे लक्षात घेऊन शेतात कडधान्य पेरली आहेत. चांगल्या वातावरणामुळे पेरलेली कडधान्य चांगली उगवली असून चांगले उत्पादन मिळेल अशी आशा आहे.
दत्ताराम यादव - शेतकरी, माणगाव
* नोव्हेंबरपूर्वी कडधान्याची केलेली पेरणी वाया गेली होती. दुसऱ्यांदा केलेली पेरणी चांगली रुजली असून थंडी व चांगले वातावरण राहिल्यास चांगले उत्पादन मिळेल.
-सीताराम पोटले शेतकरी,माणगांव