Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

आंदोलन करणे हा गुन्हा नाही -- बी.जी.कोळसे पाटील

 आंदोलन करणे हा गुन्हा नाही -- बी.जी.कोळसे पाटील

 राजेश भिसे-नागोठणे



लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या मार्गदर्शनाखाली येथील रिलायन्स कंपनीच्या विरोधात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, कायम, कंत्राटी तसेच निवृत्त कामगार आणि सुशिक्षित बेरोजगार यांचे वतीने चालू करण्यात आलेल्या आंदोलनाचा आज रविवारी दहावा दिवस आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील यांनी शनिवारी आंदोलनस्थळाला भेट दिली. त्यावेळी कोळसे पाटील यांनी नागोठणे पत्रकार संघाच्या पत्रकारांशी संवाद साधून केलेला वार्तालाप ...

           आंदोलन उभे करून मगच न्यायालयात जात असतो. आज या आंदोलनाचा नववा दिवस असून प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवूनच आंदोलनाचा गोड शेवट हेच माझे उद्दिष्ट आहे व त्यासाठी ही शेवटची आरपारची लढाई करीत असल्याचे बी.जी.कोळसे पाटील यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. ३६ वर्षांपूर्वी तेव्हाच्या आयपीसीएल कंपनीत सर्व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळेल असा करार झाला होता. कालांतराने ही कंपनी केंद्र सरकारने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीला विकली असली तरी, आयपीसीएलच्या करारापासून ते सुटले नसून या कराराला ते बांधील असल्याने प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यासाठी आमची संघटना लढत आहे व त्यात आम्ही यश मिळविणारच असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. नोकरीनंतर १९९० सालापासून एन्रॉन, जैतापूरसह अनेक ठिकाणी आमच्या संघटनेकडून आंदोलने करून तेथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी यशस्वी ठरलो आहोत. येथील रिलायन्सच्या व्यवस्थापनाची मी भेट घ्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, एवढ्या वर्षात आतापर्यंत  कधीही कोणत्याही व्यवस्थापनाला भेटत नाही हे माझे वैशिष्ट्य असून रिलायन्स व्यवस्थापनाची भेट घेण्याचा प्रश्नच उरत नाही असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसऱ्या दिवशी येथील स्थानिक आमदार रविशेठ पाटील येथे आले होते असे मला समजले. या प्रश्नाची माहिती जाणून घेण्याच्या निमित्ताने  ते कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी कंपनीच्या  निवासीसंकुलात गेले होते. परंतु सगळे अधिकारी बाहेर आहेत हे सांगून त्यांना एकही अधिकाऱ्याने भेटण्याचे सौजन्य दाखवले नव्हते असे समजून आले आहे. 


हा लढा जनशक्तीनेच सुटेल असा विश्वास कोळसे पाटील यांनी व्यक्त केला. परिसरातील जनतेने हे आंदोलन उचलून धरले पाहिजे. रिलायन्स व्यवस्थापन तसेच सरकारी यंत्रणा या आंदोलनाकडे आजही डोळेझाक करीत आहे. आमचे म्हणणे एकच आहे की, प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिली तरच आमचे आंदोलन थांबेल. कोणाची दलाली करत नसल्याने कोणालाही घाबरत नाही. अहिंसेचा मार्ग न सोडता नाक दाबून तोंड कसे उघडायचे हे मला माहित आहे. आंदोलन करणे हा गुन्हा नसून संविधानाने सर्वांना तो हक्क मिळवून दिला आहे. आंदोलनाची पुढची दिशा कशी आहे, याबाबत विचारले असता सुप्रीम कोर्टापर्यंत मोफत काम करणाऱ्या ज्येष्ठ वकिलांची फौज आमचेकडे आहे असे सूचक विधान त्यांनी यावेळी केले. माझी ३३ कोटी रुपयांची संपत्ती आहे, असा गवगवा येथे होत असल्याचे समजत आहे. हा गोंगाट करणाऱ्यांनी ती एकदा जाहीर करावी असा सल्ला त्यांनी दिला. ही लढाई आरपाराची असून त्यात विजयी होणारच असा पुनरुच्चार करताना कोळसे पाटील यांनी कोणाला वाटत असेल की, आपल्याला कोणी नमवू शकत नाही ! असे ज्यांना वाटत आहे त्यांनी आमचेकडे सुद्धा अहिंसेच्या मार्गाने लढणारी बलाढ्य अशी जनशक्ती आहे हे ध्यानात घ्यावे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies