Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रिलायन्स आंदोलनाचा सातवा दिवस : रिलायन्स व्यवस्थापन आणि संघटनेमधील वाटाघाटी निष्फळ, स्थानिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा आंदोलनाला सक्रिय पाठिंबा

 रिलायन्स आंदोलनाचा सातवा दिवस : रिलायन्स व्यवस्थापन आणि संघटनेमधील वाटाघाटी निष्फळ, स्थानिक ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा आंदोलनाला सक्रिय पाठिंबा

 राजेश भिसे-नागोठणे


येथील रिलायन्स कंपनीच्या Of the Reliance movement विरोधात प्रकल्पग्रस्तांकडून शुक्रवारी २७ नोव्हेंबरपासून चालू करण्यात आलेल्या आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे. रिलायन्स व्यवस्थापन आणि लोकशासन संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात सहाव्या दिवशी झालेली चर्चा निष्फळ ठरली असून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा दावा संघटनेने केला आहे. 

लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने मागील शुक्रवारपासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात आले आहे. बुधवारी २ डिसेंबरला दुपारनंतर कंपनीच्या विनंतीवरून व्यवस्थापन आणि संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात रिलायन्स कंपनीच्या मटेरियल बिल्डिंगमध्ये चर्चा घेण्यात आली. कंपनीच्या वतीने विनय किर्लोस्कर, उदय दिवेकर, रमेश धनावडे, तर लोकशासनच्या वतीने स्थानिक पदाधिकारी शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, उषा बडे, सुरेश कोकाटे, नीता बडे, गुलाब शेलार तसेच रोह्याचे डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी, पो. नि. दादासाहेब घुटुकडे चर्चेत सहभागी झाले होते. आंदोलन करून कोणतेही प्रश्न सुटत नसल्याने आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती व्यवस्थापनाकडून करण्यात आली. मात्र, कंपनीच्या विरोधात १३ नोव्हेंबरला आंदोलन करण्यात आले तेव्हा कंपनीच्या एका अधिकाऱ्याने २७ नोव्हेंबरला चर्चा करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. कंपनीने दिलेले आश्वासन आजपर्यंत पूर्ण केले नसल्याने आमची फसवणूक झाली असून आपल्यावरील विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला असल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले. कंपनीकडून मागण्यांसंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून या मागण्यांचे त्यात विश्लेषण करण्यात आले आहे. परंतु ते निखालस खोटे असल्याचे पदाधिकारी शशांक हिरे आणि गंगाराम मिणमिणे यांचे म्हणणे आहे. आमच्यात झालेली चर्चा आम्हाला मान्यच नसून मागण्यांबाबत कंपनी जो पर्यंत सकारात्मक चर्चा करीत नाही, तोपर्यंत येथून उठणारच नसल्याचा दावा संघटनेकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष कोळी यांचेसह कडसुरेचे सरपंच राजेंद्र शिंदे, पिगोंडेचे उदय जवके, झोतीरपाडाचे सरपंच दत्ता तरे यांनी बुधवारी सायंकाळी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. आंदोलन चालू झाल्यापासून सहाव्या दिवसाच्या सकाळपर्यंत कंपनीत जागा गेलेल्या गावांचे सरपंच आंदोलनाकडे लक्षच देत नसल्याने आंदोलनाचे ठिकाणी दररोज उलटसुलट चर्चा कुजबुजली जात होती. मात्र, सहाव्या दिवशी सायंकाळी या जबाबदार मंडळींनी या ठिकाणी जात आपला पाठिंबा जाहीर करून आमच्या ग्रामपंचायती तुमच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. या लोकप्रतिनिधींच्या सक्रिय पाठींब्यामुळे आंदोलनाला एकप्रकारे बळच मिळाले असून खऱ्या अर्थाने आंदोलनाला आणखी धार येईल असे बोलले जात आहे. कंपनीचे प्रकल्पग्रस्त असलेल्या वरवठणे आणि वणी या ग्रामपंचायतींचा सुध्दा लवकरच पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात असून नागोठणे ग्रामपंचायतीची भूमिका मात्र अजून स्पष्ट झालेली नाही. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies