जिवापाड जपलेल्या टाॅमी कुत्र्याने घेतला अंतिम श्वास आणि दुःख अनावर .........................
रविंद्र कुवेसकर -उतेखोल/माणगांव
उतेखोल येथिल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंता थळकर यांना त्यांचे मित्र नगरसेवक रत्नाकर उभारे यांनी बारा वर्षापूर्वी एक कुत्र्याचे पिलू भेट दिले होते. त्याला थळकर कुटुंबियांनी जिवापाड जोपासले. बघता बघता हे पिलु मोठे झाले. त्याचे टाॅमी असे नामकरन करण्यात आले. या गुणी आणि सर्वांचा लाडका कुत्रा टाॅमीने आज मार्गशीर्ष महिन्यातील गुरुदेव दत्तांच्या गुरुवारी दुपारी, वयाच्या बाराव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. आणि थळकर कुटुंबियांना दुःख अनावर झाले. कुत्र्या सोबत खेळत लहानाचा मोठा झालेला थळकर यांचा १२ वर्षाचा एकुलता एक मुलगा साईराज आपल्या आईला रडताना तिच्या डोळ्यातील अश्रु पाहून टाॅमी कडे बघुन हुंदके देऊन रडत होता. घरातील सर्वच जण ओक्साबोक्शी रडू लागले. हे दृष्य पाहून येथे उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. कुत्र्याची जात ईमानी शिवकालीन वाघ्याची गोष्ट आठवली.
टाॅमीनेही घरातील सगळ्यांनाच लळा लावला, गेले नऊ दिवस अन्नाचा कणही न खाल्लेल्या टाॅमीवर पशु वैद्यानी खुप उपचार केले, इंजेक्शन दिले, सलायन लावले परंतु उपयोग झाला नाही. नेमके आजच मार्गशीर्ष गुरुवारी त्याने प्राण सोडला हे विशेष असल्याची चर्चा येथे होती. उतेखोल येथील वाटरसप्लाय रोड पाण्याच्या टाकी कडील वसाहतीत या अतिशय हुशार टाॅमीचा चांगलाच दरारा होता. त्याला माणसाने बोलले समजत असे. आपणास टाॅमी रस्त्यात दिसला आणि त्याला नुसत घरी जा अस बोललो तरी तो घरी जात असे.
येथेच राहणारे पर्यावरण प्रेमी शंतनु कुवेसकर याची या कुत्र्याशी चांगलीच गट्टी होती. शंतनु, साईराज आणि थळकर कुटुंबीयाखेरीज टाॅमीच्या अंगाला कोणीही हात लावलेला त्याला चालत नसे. येथील गावातील प्रत्येक जण टाॅमीला ओळखत. त्याचे जवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नसे. रात्री जागता पहार चोरांनाही याची दहशत असायची. त्याच्या मृत्युने आपल्या घरातील एक सदस्य गमावल्याचा दुःखद प्रसंग येथे अनुभवला. टाॅमीची अंतिम पुजा हळद-कुंकू वाहून, आरती ओवाळून पुष्पहार अर्पण करुन कफन टाकून त्याचे दफन करण्यात आले. त्या ठिकाणी एक रोपटे लावून टाॅमीची आठवण जोपासण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.