वैशिष्ट्यपूर्ण भात जाती विकसित करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- डाॅ. संजय भावे - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, January 14, 2021

वैशिष्ट्यपूर्ण भात जाती विकसित करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- डाॅ. संजय भावे

 वैशिष्ट्यपूर्ण भात जाती विकसित करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल- डाॅ. संजय भावे

ज्ञानेश्वर बागडे
महाराष्ट्र मिरर टीम कर्जतभाताची उत्पादकता वाढविण्यासाठी आता वेगवेगळया संशोधन पध्दती अवलंबून अधिक उत्पादन देणाऱ्या, कीड-रोग प्रतिकारक, समग्र पोषणमूल्ययुक्त जाती  विकसित करण्यावर भर देणे गरजेचे असून परिणामकारकरीत्या परिवर्तनशीलता निर्माण करण्यासाठी उत्परिवर्तन प्रजनन तंत्रज्ञान मैलाचा दगड ठरेल. असे प्रतिप्रादन डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डाॅ. संजय भावे यांनी केले. प्रादेशिक कृषि संशोधन केंद्र, कर्जतच्या सहयाद्री सभागृहात ५५ व्या महाराष्ट्र राज्य वार्षिक भात गट चर्चेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

व्यासपीठावर डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ.एम.एम.बुरोंडकर, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ.ए.एल.नरंगळकर, वनस्पती रोगशास्त्र विभागाचे प्रमुख डाॅ.एम.एस.जोशी, सहयोगी संशोधन संचालक डाॅ.एस.बी.भगत, भात विशेषज्ञ डाॅ.आर.एल.कुणकेरकर उपस्थित होते. 

डाॅ.भावे पुढे म्हणाले की, ‘भात व गरीबी’ ऐवजी ‘भात व भरभराट’ असे समीकरण तयार होण्यासाठी भात प्रक्रिया उद्योग निर्मितीला चालना देणे आवश्यक आहे. अधिक उत्पन्न वाढीसाठी भातानंतर भात ऐवजी भात-कडधान्य, भात-तेलबिया आधारित कृषी पध्दती अवलंबविणे आवश्यक असून समग्र पोषणमूल्यासाठीही ती गरजेची आहे, असे त्यांनी नमूद केले.

डाॅ.बुरोंडकर म्हणाले की, दर्जा, उत्पादकता आणि प्रतिकारक्षमतेबरोबरच बदलत्या वातावरणनुरूप शाश्वत उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या  निर्मितीवर भर देण्याची गरज आहे. पारंपरिक पध्दतीने नवीन जात निर्माण करण्यास लागणारा ८ ते १० वर्षांचा कालावधी कमी करण्यासाठी पारंपरिक पैदास पध्दतीबरोबरच गतिमान पैदास पध्दतीचा अवंलब करणे आवश्यक आहे. रब्बी हंगामासाठी स्वतंत्र भात जात असावी तसेच खरीप हंगामासाठी उशिराने येणाऱ्या गरव्या व अधिक उत्पादन देणाऱ्या जाती निर्मितीवर भर द्यायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. 

डाॅ. नरंगळकर यांनी कीड रोगाची तीव्रता कमीत कमी राखून अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विकसित करण्याची गरज प्रतिपादित केली.

डाॅ.जोशी म्हणाले की, वातावरणातील बदलानुरूप भातावरील रोगामध्ये बदल आढळून येत आहे. कोकणात यापूर्वी नगण्य समजल्या जाणाऱ्या ‘पर्णकोष करपा’, ‘पर्णकोष कुजवा’ सारख्या रोगांची तीव्रता वाढू लागल्याने या रोगांना प्रतिकारक्षम जाती निर्माण करणे आवश्यक असून त्यादृष्टीने संशोधन कार्य हाती घेण्यात आले आहे. 

डाॅ. भगत यांनी भाताचे महत्त्व स्पष्ट केल्यावर भविष्यातील भात शेतीमधील आव्हाने, धोके व संधी यांचा उहापोह करीत रोगप्रतिकारकक्षम जाती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे सांगितले.

डाॅ.कुणकेरकर यांनी दृकश्राव्य माध्यमातून सादरीकरणाद्वारे देश, राज्य व कोकण मधील भाताची सद्यस्थिती विशद करीत संशोधन कार्याचा आढावा घेतला. 

कार्यक्रमाच्या सुरूवातीला व्यासपीठावरील मान्यवरांनी स्व.बाळासाहेब सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन केले व दीप प्रज्वलन केल्यावर वार्षिक अहवालाचे प्रकाशनही केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डाॅ.रवींद्र मर्दाने यांनी केले. आभार सहा.भात विशेषज्ञ डाॅ.पी.बी.वनवे यांनी मानले. कार्यक्रमाला डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.संजय सावंत व संशोधन संचालक डाॅ.पराग हळदणकर हे ऑनलाईन तर कृषि संशोधन केंद्र, शिररगाव, रत्नागिरीचे प्रभारी अधिकारी डाॅ.भरत वाघमोडे, जैव तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अधिकारी डाॅ.एस.व्ही. सावर्डेकर व वनशास्त्र महाविद्यालयाच्या कृषि वानिकेचे शास्त्रज्ञ डाॅ.व्ही.व्ही.दळवी प्रामुख्याने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment