पत्रकार हा सर्वसामान्यांचा आधारस्तंभ, अपप्रवृत्तीचा कर्दनकाळ असावा - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Thursday, January 14, 2021

पत्रकार हा सर्वसामान्यांचा आधारस्तंभ, अपप्रवृत्तीचा कर्दनकाळ असावा

 पत्रकार हा सर्वसामान्यांचा आधारस्तंभ, अपप्रवृत्तीचा कर्दनकाळ असावा-डॉ रवींद्र मर्दाने

महाराष्ट्र मिरर टीम-चंद्रपूर- पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या खऱ्या मूलभूत प्रश्नांवर उहापोह होणे गरजेचे असल्याने पत्रकारांची भूमिका  ' सर्वसामान्यांचा आधारस्तंभ व अपप्रवृत्तींचा कर्दनकाळ '  अशी असायला हवी,  असे प्रतिपादन उत्तर कोकण विभागाचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी येथे केले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या वरोरा तालुका शाखेतर्फे पत्रकार दिन सोहळा व समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या  व्यक्तींचा सन्मान समारंभ येथील शगुण सभागृहात नुकताच शानदाररित्या संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रा वसंतराव माणूसमारे होते.         व्यासपीठावर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अँड मोरेश्वर टेंमुर्डे, नगराध्यक्ष अहेतेशाम अली, बीबीसी न्यूझ, नागपूरचे वरिष्ठ प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर,        जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. गोवर्धन दुधे, दि टाईम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी मजहर अली, दैनिक हितवादचे जिल्हा प्रतिनिधी रमेश कामपेल्ली, गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष  लक्ष्मणराव गमे प्रभृती उपस्थित होते.      डॉ मर्दाने पुढे म्हणाले की, भांडवलदारांनी इलेक्ट्रॉनिक व मुद्रित माध्यमावर कब्जा मिळवून धंदा सुरू केला आहे. पत्रकारांना तुटपुंजे मानधन/ जाहिरातीचे कमिशन देउन त्यांचेही शोषण होत आहे.  सत्ताधाऱ्यांची सरकारी यंत्रणांवर कमालीची दहशत वाढल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या  न्यायाधीशांनाही पत्रकार परिषद घेऊन आपले गाऱ्हाणे मांडावे लागले. स्त्री अत्याचाराची प्रकरणे, दिल्लीतील कृषी आंदोलन, पोलीस व प्रशासकीय यंत्रणांची हडेलहप्पी भूमिका इ. घटनांचा आढावा घेत देश  हुकूमशाहीच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा त्यांनी दिला. जनतेने सजग राहण्याची गरज असून पत्रकारांनी विचलित न होता विश्वासार्हता व नीतिमत्ता जोपासावी, असे त्यांनी दोहे व कविता उद्धृत करीत पटवून दिले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची खरी जन्मतारीख दि.२० फेब्रुवारी १८१२ असल्याचे नमूद करीत त्यांनी त्यांच्या जीवनकार्याचा नेटक्या शब्दात आढावा घेतला. पत्रकार संघाचा उपक्रम सामाजिक बांधीलकी जपणारा, स्तुत्य व अभिनंदनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.       मुधोळकर यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपाचे विवेचन केले. ते म्हणाले की, पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पत्रकारितेला नवी दिशा द्यावी. आधुनिक जगात आता सर्वसामान्य व्यक्तीही पत्रकाराची भूमिका वठवू शकतो. संघाने पत्रकारांसाठी एक कार्यशाळा आयोजित करावी, अशी सूचना त्यांनी केली.

     अध्यक्षीय भाषणात प्रा. माणूसमारे यांनी अन्यायग्रस्त व्यक्ती किंवा संस्थांच्या मागे पत्रकार संघ खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही दिली.       

      अँड मोरेश्वरराव टेंमुर्डे म्हणाले की, पत्रकारांनी निर्भीडपणे वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवणे अपेक्षित असताना अपवाद वगळता पत्रकार नैतिक कर्तव्य बजावताना दिसत नाही त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.

   नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी पत्रकारांचे कार्य जोखीमपूर्ण असल्याने त्यांच्या सुरक्षिततेसाठी कायदा होणे गरजेचे असून त्यासाठी राजकीय पुढारी व सामाजिक संस्थांनी शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज प्रतिपादित केली. सत्कारमूर्तीचे वतीने सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक छोटुभाई शेख यांनी मनोगतात कृतज्ञता व्यक्त करीत विविध क्षेत्रातून निवडलेल्या व्यक्ति समाजातील आयकॉन असून अशा उपक्रमामुळे सेवा सार्थक ठरल्याचे आत्मिक समाधान मिळते, असे नमूद केले.

     कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व दीप प्रज्वलन केले. यावेळी मान्यवरांचा  पुष्पगुच्छ,शाल, सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. 

      याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग, कृषीनिष्ठ शेतकरी, सामाजिक मंडळ,  विद्युत कर्मचारी, टपाल कर्मचारी,  परिचारिका, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर यांना पुष्पगुच्छ, शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

     कार्यक्रमात ठाणेदार दीपक  खोब्रागडे, तालुका कृषी अधिकारी व्हि.आर. प्रकाश,  युवानेते विलास नेरकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सागर वझे, प्रा.बळवंत शेलवटकर, प्रल्हाद ठक, डॉ.वाय.एस.जाधव,  बंडू देऊळकर, राहुल देवडे, ओंकेश्वर टिपले, प्रवीण सूराना, दीपक खडसाने, योगिता लांडगे नगरसेवक सनी गुप्ता व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.      कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बाळू भोयर यांनी केले. सूत्रसंचालन संयुक्तरीत्या डॉ. प्रवीण मुधोळकर व  प्रा. विशाल जुमडे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजक राजेंद्र मर्दाने यांनी आभार मानले.

       कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे सचिव प्रवीण गंधारे, शाहीद अख्तर, मनोज श्रीवास्तव, आलेख रठ्ठे, सादिक थैम, जयंत आंबेकर, श्याम ठेंगडी, प्रदीप कोहपरे, प्रतिक माणूसमारे, हरीश केशवानी, वीरेंद्र राय, सुरेन्द्र चौहान इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. 

     या कार्यक्रमाने सत्कारमूर्तींना अलौकिक समाधान तर साऱ्या सभागृहाला चैतन्यशील अनुभवाची संजीवनी मिळाली.

No comments:

Post a Comment