Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वांना बरोबर घेऊन जाणारे-- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वांना बरोबर घेऊन जाणारे-- जलसंपदा मंत्री जयंत पाटील

महाराष्ट्र मिरर टीम-माणगांवकोविड संकटाशी मुकाबला करीत महाविकास आघाडी सरकार विकास कामांना चालना देत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वांना बरोबर घेऊन जाणारे असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास खात्याचे मंत्री ना.जयंत पाटील यांनी माणगाव येथील कार्यक्रमात उद्घाटक म्हणून बोलताना व्यक्त केले.

       माणगाव येथील जलसंपदा भवनाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज (सोमवार, दि.25 जानेवारी रोजी) जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंत पाटील यांच्या हस्ते व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

      यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, सुरेश लाड, प्रभाकर उभारे, माणगाव पंचायत समिती सभापती अलका जाधव, नगराध्यक्षा योगिता चव्हाण, बाबूशेठ खानविलकर, शेखरशेठ देशमुख, नाजीमभाई हसवारे, इकबालशेठ धनसे, माणगाव तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी तथा तहसिलदार मैनक घोष, दिपकशेठ जाधव, अँड.सायली दळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, महिला व बालकल्याण समिती सभापती गीता जाधव, सभापती बबन मनवे, संगिता बक्कम, तळा पंचायत समितीचे सभापती अक्षरा कदम, म्हसळा पंचायत समिती सभापती सौ.कापरे , श्रीवर्धन पंचायत समितीचे सभापती जितेंद्र सातनाक, *रोहा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे,* अँड.उत्तम जाधव,तळा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत रोडे, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, माणगाव नगरपंचायतीचे नगरसेवक,नगरसेविका यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.        जलसंपदा मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले की, माणगाव येथे जलसंपदा खात्यातर्फे बांधण्यात आलेली जलसंपदा विभागाच्या या इमारतीचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने  करण्यात आले आहे. आता पुढे येथील फर्निचरचे काम देखील चांगल्या पद्धतीने करण्यात यावे आणि जनतेलाही उत्तम सेवा द्यावी.

        खा. सुनील तटकरे हे दूरदृष्टी असलेले लाेकप्रतिनिधी असून त्यांनी जलसंपदा खात्याचे मंत्री असताना दूरदर्शीप्रमाणे या भागातील जलसंपदा विभागातील कार्यालय एकत्रित करण्यासाठी ऐसपैस इमारत उभी केली. लोकांची व्यवस्था या ठिकाणी उत्तम पद्धतीने होऊन अधिकारी व कर्मचारी वर्गाने लोकांचे प्रश्न जबाबदारीने  सोडवावेत, असे सांगून या ठिकाणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना, जेष्ठांना बसण्यासाठी दालनाची व्यवस्था करावी. ही इमारत उभे राहण्याचे सर्व श्रेय खासदार सुनिल तटकरे यांनाच जाते. महाराष्ट्रात निसर्गाचे सर्वात मोठे देणं रायगड जिल्हयातील श्रीवर्धन व म्हसळा तालुक्याला लाभले आहे. या भागात पर्यटनाला महत्व आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे पर्यटन वाढीच्या दृष्टीने चांगले काम करीत आहेत. अलिबाग तालुक्यातील सांबारकुंड प्रकल्पाचे काम मार्गी लागले असून येणाऱ्या काळात कुंभे जलविद्युत प्रकल्प व पन्हळघर धरणाचे काम मार्गी लावू तसेच माणगावकरांसाठी चांगला बंधारा काळनदीत बांधू ज्याचा उपयोग पर्यटनासाठी निश्चितपणे होऊ शकेल. त्याचप्रमाणे हरिहरेश्वर या ठिकाणी बंधारा बांधण्याचे विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

      खासदार सुनील तटकरे म्हणाले की, कोकणातील पाणी कोकणातच आले पाहिजे, ही भूमिका सातत्याने आपण घेतली. माणगावच्या बारमाही वाहणाऱ्या काळनदीवर बंधारा असावा, अशी मागणी करून प्रस्ताव तयार करण्यात आला होता.जलसंपदा खात्याने विशेष बाब म्हणून या बंधाऱ्याला मंजूरी द्यावी. माणगाव शहर हे झपाट्याने विकसित होत आहे. नोकरीधंद्यानिमित्त या ठिकाणी लोक येत असल्याने येथील नागरीकरण वाढले आहे. जलसंपदा भवनाच्या इमारतीबरोबरच त्याशेजारीच मध्यवर्ती प्रशासकीय भवनाची व पंचायत समिती कार्यालयाचीही वास्तू उभी केली आहे, असे सांगत त्यांनी जलसंपदा मंत्री व तत्कालीन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांचे विशेष आभार मानले.       पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा दिवस असून जलसंपदा विभागातर्फे माणगावात बांधण्यात आलेली ही वास्तू अतिशय अभिमानास्पद आहे. या जलसंपदा भवनाचे काम लवकरात लवकर व चांगल्या पद्धतीने व्हावे, या प्रतिक्षेत आपण सारेजण होतो. चांगली वास्तू उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या सुसज्ज अशा इमारतीचा जनतेला निश्चितच लाभ हाईल,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

    आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपल्या मनाेगतात जलसंपदा विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या माणगाव येथील जलसंपदा विभागाच्या इमारतीचे काम देखणे झाले आहे.यासाठी खा.सुनील तटकरे यांनी विशेष प्रयत्न केल्याने मी त्यांना धन्यवाद देतो. कोविडच्या काळात आपण सारे अस्थिर होतो. त्याकाळात सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागली.आता हळूहळू सर्व काही स्थिरस्थावर होत आहे, असे सांगून या शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांचे काम तसेच धरणांची कामे मार्गी लागतील,असा विश्वास व्यक्त केला. 

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता जलसंपदा विभाग,कोकण प्रदेश, मुंबई संतोष तिरमनवार यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies