पोवई नाक्यावर उभा राहणार ' आय लव्ह सातारा ' सेल्फी पॉईंट आ . शिवेंद्रसिंहराजे , सौ . वेदांतिकाराजे करणार स्वखर्चातून सुशोभीकरण
प्रतिक मिसाळ सातारा
सातारा- आपल्या सातारा शहराचं नाक म्हणून पोवई नाक्याची ख्याती आणि ओळख आहे . पोवई नाका अर्थात छ . शिवाजी महाराज सर्कल येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर आता याच पोवई नाक्यावर ' आय लव्ह सातारा ' आयलँड , सेल्फी पॉईंटची लवकरच उभारणी होणार आहे . आ . श्रीमंत छ . शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि श्रीमंत छ . सौ . वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच स्वखर्चातून सेल्फी पॉईंट उभारणीसह पोवई नाका येथे सुशोभीकरण केले जाणार आहे . प्रत्येक शहराची एक खास ओळख असते . सातारा शहर हे तर ऐतिहासिक शहर असून पोवई नाका हे सातारा शहराचे महत्वाचे ठिकाण मानले जाते . याच पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात आणि कराड , कोरेगाव , माण , फलटण , खंडाळा , वाई , महाबळेश्वर तालुक्यातून याच ठिकाणी प्रथम प्रवेश होतो . त्यामुळे पोवई नाक्याला ऐतिहासिक आणि विशिष्ट स्थानिक असे महत्व आहे . याच पोवई नाक्यावर नुकतीच ग्रेड सेपरेटरची उभारणी झाली असून वाहतूक सुरळीत झाली आहे . त्यामुळे सातारकरांना नेहमीच अभिमानास्पद असणाऱ्या पोवई नाक्यावर आ . शिवेंद्रसिंहराजे आणि सौ . वेदांतिकाराजे यांच्या संकल्पनेतून भारदस्त अशा सेल्फी पॉईंटची उभारणी केली जाणार आहे . कोल्हापूर , कराड यासह अनेक शहरांमध्ये सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत . त्याच धर्तीवर सातारा शहराची आगळी वेगळी ओळख सांगणारा आय लव्ह सातारा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे . याठिकाणी भव्यदिव्य सुशोभीकरण करण्यात येणार असून हा आयलँड लक्षवेधी असणार आहे . सातारकरांसह बाहेरून येणारे पर्यटक , प्रवाशी यांच्यासाठी हा सेल्फी पॉईंट एकप्रकारचे पर्यटनस्थळ असणार आहे . आ . शिवेंद्रसिंहराजे आणि सौ . वेदांतिकाराजे भोसले यांच्या स्वखर्चातून या पॉईंटची उभारणी केली जाणार असून या सेल्फी पॉइंटची सातरकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.