प्रशिक्षणरुपी ज्ञानयज्ञ अग्निहोत्राप्रमाणे धगधगते राहणे आवश्यक -डॉ रवींद्र मर्दाने
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
प्रशिक्षणाने प्रशिक्षणार्थी ज्ञानसंपन्न होतो.प्रशिक्षण ही निरंतर चालणारी ज्ञानधिष्ठित प्रणाली असल्याने व्यक्तीला कालानुरूप अद्ययावत राहण्यासाठी मदत करते तसेच मानसिक आत्मबलही वाढवते, म्हणून प्रशिक्षणरुपी ज्ञानयज्ञ सतत धगधगते राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ रवींद्र मर्दाने यांनी केले.बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान, अलिबाग व आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरज प्रभागातील बांगरवाडी येथे आदिवासी महिलांसाठी पापड, लोणचे, मसाले बनविण्याचे दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी बालाजी पूरी होते.
व्यासपीठावर बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, अलिबागचे संचालक विजयकुमार कुलकर्णी, आदिवासी ठाकूर समाज सेवा मंडळ महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मनोहर पादिर, तालुका अध्यक्ष चाहू सराई, सचिव धर्मा निर्गुडा, कनिष्ठ अभियंता गोवर्धन नखाते,महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाचे तालुका अध्यक्ष राजू नेमाडे, प्रभाग समन्वयक राम हणमंते,सरपंच अंकुश घोडविंदे,ग्रामसेवक बाळू मोरे, प्रशिक्षक जयश्री बडेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. मर्दाने पुढे म्हणाले की, संयोजकांनी भविष्याचा वेध घेत प्रशिक्षण, जागा, आर्थिक तरतूद आणि विपणनची व्यवस्था केल्याने यशाची दारे आपोआप मोकळी होतील व येणारा काळ तुमचाच असेल.प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास तसेच स्वयंरोजगाराने क्रयशक्ती वाढून जीवनमान व आत्मसन्मान उंचावण्यास मदत होईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय मार्गदर्शनात बालाजी पुरी म्हणाले की,बँकेनेच प्रशिक्षण आयोजित केल्याने स्वयंरोजगार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.सेवेमध्ये असेपर्यंत अशा उपक्रमासाठी पूर्णतः सहकार्य करून सामूहिकरित्या आदर्श कार्य उभे करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कुलकर्णी म्हणाले की, आदिवासी महिला प्रशिक्षणार्थींनी पूर्ण दिवस शंभर टक्के उपस्थिती लावली. त्यामुळे व्यवसाय व विपणन कौशल्य आत्मसात करून त्या खंबीरपणे बोलायला लागल्या, त्यांची मानसिकता बदलण्याचे कठीण आव्हान आम्ही लीलया पेलले,हेच आमचे यश आहे.बंगलोर येथून घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीमध्ये त्या उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी घोषित करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी राजू नेमाळे यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती कार्यक्रमाची माहिती दिली.यानिमित्ताने सरिता गावंडा, सुनीता शेंडगे,सोनम निर्गुडा, दीपा भगत, वैशाली दुदा यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोहर पादिर यांनी केले.सूत्रसंचालन प्रशिक्षक मीना श्रीमाळी यांनी केले.आभार प्रशिक्षक प्रसाद पाटील यांनी मानले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ७० प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सुरुवातीला प्रशिक्षणार्थी महिलांनी स्वरचित सादर केलेली तीन स्वागत गीतं कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ठरली.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.