मालाची रक्कम खात्यात जमा झाल्याचा खोटा मेसेज पाठवून दुकानदाराची फसवणूक ; दोन वाहनांसह तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
राजेश भिसे-नागोठणे
खरेदी केलेल्या मालाची रक्कम गुगल पे द्वारे खात्यात जमा झाला असल्याचा मोबाईलवर खोटा मेसेज पाठवून माल लंपास करण्याचा प्रयत्न नागोठणे पोलिसांनी हाणून पाडला आहे. याप्रकरणी माल भरलेला टेम्पो तसेच स्कुटीसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
वाकण येथील साई किराणा दुकानात बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी विलिना गोडेतेलाचे दोन बॉक्स (किंमत ३१२० रुपये), विलिना गोडेतेलाचे पाच लिटरचे दोन कॅन (१३२० रुपये), रुची गोल्ड पामोलिन तेलाचा एक बॉक्स (१२०० रुपये), फाईव्ह स्टार चॉकलेटचा चाळीस गोळ्यांचा एक बॉक्स (३८० रुपये) आणि रोख रक्कम रुपये ७२० असे घेऊन मालाचे पैसे गुगल पे द्वारे खात्यात जमा करतो असे सांगितले आणि आपल्या खात्यात पैसे जमा झाले आहेत असा खोटा मेसेज सुद्धा दुकानदाराला दाखविला. पैसे जमा झाले असल्याचे दाखविल्यावर या भामट्यानी माल गाडीत टाकून तेथून पळ काढला. मात्र, खात्यात पैसेच जमा झाले नसल्याचे निदर्शनास आल्यावर दुकानदाराने नागोठणे पोलिसांच्या लक्षात ही बाब आणल्यावर पोलिसांनी माल भरलेल्या एमएच ४२ एम ७०६२ क्रमांकाचा टेम्पो तसेच एमएच ०३ हा अर्धवट क्रमांक असलेली स्कुटी आणि माजिद अब्दुल हाफिज शेख (३३), यासिन रहमान शेख (३६) आणि महंमद सुलेमान शेख (२८), सर्व राहणार गोवंडी, मुंबई यांना ताब्यात घेतले. चौथा भामटा फरार झाला असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले. टेम्पो मोठ्या प्रमाणात माल भरलेला दिसत असल्याने या भामट्यानी दुसरीकडे सुद्धा अशीच फसवणूक केली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्याची नागोठणे पोलिसठाण्यात नोंद करण्यात आली असून पो.नि. दादासाहेब घुटुकडे यांचे मार्गदर्शनाखाली हे. काँ. जी.एम. भोईर पुढील तपास करीत आहेत.
----------------------------------------------------------------------------------------
एसटी वाहकाची रक्कम लंपास
(राजेश भिसे) --- एसटी बस वाहक खाली उतरला असल्याची संधी साधून एका अज्ञात इसमाने बसमध्ये वाहकाच्या पत्र्याच्या पेटीतअसलेल्या चामडी बॅग लांबवून पळ काढला. हा प्रकार आज गुरुवारी सकाळी येथील एसटी बसस्थानकात घडला.
सकाळी साडेसातच्या दरम्यान पेण पाली एसटी बस नागोठणे स्थानकात आली होती. गाडी थांबली असल्याने या गाडीचे वाहक, प्रसाद रामचंद्र पाटील, रा. ओढांगी,ता. पेण हे काही कामासाठी खाली उतरले होते. याचा फायदा घेत एका अज्ञात व्यक्तीने वाहकाच्या आसनाच्या वरील कॅरिअरवर असणाऱ्या पत्र्याची पेटी काढून लंपास केली. या पेटीत काळ्या रंगांच्या चामडी बॅगेत २१ हजार रुपये रोख रक्कम, तसेच १६ तिकिटांचे गठ्ठे, वाहकाचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड होते असे पोलिससूत्रांकडून सांगण्यात आले. या गुन्ह्याची नागोठणे पोलीसठाण्यात नोंद करण्यात आली असून पो.नि.घुटुकडे यांचे मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जितेंद्र चव्हाण पुढील तपास करत आहेत.