चिकणी येथे गॅरेजमध्ये सापडला गांजा आणि चिलीम
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत केली कारवाई
अमूलकुमार जैन-मुरुड
रोहा तालुक्यातील नागोठणे पोलीस ठाणेच्या हद्दीतील मौजे चिकणी येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या पथकाने एका गॅरेजमध्ये धाड टाकीत रु.48,560/-किंमतीच्या चार किलो गांजासाहित28 चिलीम जप्त करण्यात आल्या आहेत.
स्थानिक गुन्हेशाखे कडील नेमणुकीतील पोलीस हवालदार प्रशांत दबडे यांना रोहा उपविभागीतील नागोठणे पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील मौजे चिकणी या गावात मोहन हुंनू राठोड ही व्यक्ती बेकायदेशीरपणे गांजा विक्री करीत आहे माहिती मिळाली असता त्याची खातरजमा करण्यात आली.
परि.पोलीस उपअधिक्षक सुहास शिंदे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे आणि पोलीस अंमलदार प्रशांत दबडे, स्वप्निल येरुणकर, राजेंद्र गाणार या पथकाने मौजे चिकणी गावचे हद्दीतील एहसान गॅरेजचे बाजूला असलेल्या भंगार दुकानासमोर पंचासमवेत सापळा रचून मोहन हंनू राठोड, (रा.चिकणी, ता.रोहा )या इसमास ताब्यात घेतले. त्या इसमांच्या ताब्यातून 04 किग्रॅ वजनाचा ‘‘गांजा’’ हा अंमली पदार्थ आणि गांजाचे सेवन करण्याकरीता उपयोगात येणा-या 28 चिलिम असा एकुण 48,560/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत नागोठणे पोलीस ठाणे काँ.गु.रजि.नं.12/2021, एन.डी.पी.एस. अॅक्ट 1985 चे कलम 8(क), 20(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरिक्षक सचिन निकाळजे हे करीत आहेत.