धक्कादायक!
पुण्यातून परराज्यात जाताना 600 रुपयांमध्ये करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट; टोळी जेरबंद
ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशी बसवून देणारेच देत होते निगेटिव्ह रिपोर्ट
अमोल धोत्रे -पुणे
पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून इतर राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना करोना चा बनावट निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 28 करोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट हस्तगत केले आहेत. याप्रकरणी दोन जण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
याप्रकरणी पत्ताराम केसारामजी देवासी आणि राकेशकुमार बस्तीराम वैष्णव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. त्यांचे इतर दोन साथीदार अद्याप फरार असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातून राजस्थान ला जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दिला गेला असल्याची माहिती पोलीस अधिकारी काटे यांना मिळाली होती. निगेटिव्ह रिपोर्ट हवा असल्यास 500-600 रुपये मोजावे लागत असल्याचे तपासात पुढे आलं आहे. दरम्यान, दोन्ही आरोपी हे ट्रॅव्हल्समध्ये प्रवाशी बसवून देण्याचं काम करत, तेव्हा तिथे परराज्यात जाणाऱ्या प्रवाशांना करोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट लागत असल्याने आरोपी केवळ 500- 600 रुपयांमध्ये रिपोर्ट देत असत. त्यांच्याकडे आढळले रिपोर्ट हे बावधन येथील लाईफनीटी वेलनेस इंटरनॅशनल लिमिटेड येथील असून त्यांच्या निगेटिव्ह रिपोर्ट वरून इतर डॉक्टरांच्या बनावट सह्या करून रिपोर्ट बनवत असत. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. करोनाचे बनावट निगेटिव्ह 28 रिपोर्ट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके हे करत आहेत.