ऊस हंगामाची सांगता ; शेतकर्याना कोट्यावधीचा फटका
थकीत एफआरपी, काटामारी , ऊसतोडीसाठी अडवणुकीने शेतकरी नाराज
उमेश पाटील सांगली
गत वर्षभरापासुन संपुर्ण जगावर कोरोनाचे संकट घोंघावत आहे. याचा ऊद्योगधंद्यासह शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसला. दराअभावी हातातोडाशी आलेल्या पिकांवर शेतकर्याना नांगर फिरवावा लागला. नुकताच ऊस हंगामही संपला आहे . परंतु या हंगामात ऊस उत्पादक शेतकर्याना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. काटामारी, ऊसबिलाचे तुकडे , ऊसतोडीसाठी वरपैशाची मागणी यामुळे शेतकर्यातुन प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
कडेगाव तालुक्यात ताकारी ,टेंभू ऊपसा सिंचन योजनांमुळे मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यात अंदाजे 21 हजार हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. एकरकमी पैसे मिळत असल्याने शेतकर्यातुन ऊस पिकाला प्राधान्य दिले जाते. परंतु काही कारखान्यानी ऊस गाळपास नेऊन महिना उलटला तरी पुर्ण एफआरपी दिलेली नाही. ऊस दर नियंत्रण कायद्यानुसार ऊस गाळपास नेल्यापासुन 14 दिवसात पुर्ण एफआरपी देणे बंधनकारक आहे. परंतु ह्या नियमाची सर्वत्र पायमल्ली होत आहे. अर्धवट बिलाने शेतकर्याची सोसायटीची कर्जेही भागली नसल्याचे दिसुन येत आहे. यामुळे शेतकर्यावरील व्याजाचा भुर्दडही वाढत आहे. तर काही कारखान्यानी गाळपास आलेल्या ऊसाचीच काटामारी केली आहे. विविध माध्यमातून ही काटामारी होत आहे. याचबरोबर ऊस तोडीसाठीही शेतकर्याकडुन हजारो रुपये ऊकळण्यात आले आहेत. ऊस तोड कामगाराना स्वंतत्रपणे ऊसतोडीचे पैसे मिळत असतानाही शेतकर्याकडुन एकरी तीन हजारापासुन सात हजारापर्यंत पैसे घेण्यात आले. तर ऊस तोड मशीन मालकांनीही शेतकर्याकडुन ऊसतोडीसाठी पैसे घेतले आहेत.अशा प्रकारे या हंगामात शेतकर्याना कोट्यावधी रुपयांचा फटका बसला असुन शेतकर्याना आपला ऊस गाळपास घालवताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे. एकीकडे कोरोनाचे संकट, वाढती महागाई या सर्वांवर मात करतच ऊस उत्पादकांना आलेल्या ऊसबिलातुन आपल्या संसाराचा गाडा वर्षभर रेटावा लागणार आहे.