कोरोनाग्रस्त जगात सांगली जिल्ह्यातील बाणूरगडला कोरोना शिवला देखील नाही!!
उमेश पाटील -सांगली
सध्या जगात सगळीकडं कोरोना विषाणूने अगदी थैमान घातले आहे. "कोरोना नाही असे जगात ठिकाण नाही, असे म्हणतात पण जिथं कोरोना नाही असे एक गाव आहे, तेही सांगली जिल्ह्यात. खानापूर तालुक्यातील बाणूरगड. एक आख्ख गाव आहे, जिथं अद्याप कोरोना विषाणू पोहोचलेला नाही. या गावाबद्दल थोडंसं...
सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या तीन तालुक्यांच्या सीमेवर हे बाणूरगड नावाचं गाव वसलं आहे. सह्याद्री पर्वताच्या शिखर शिंगणापूरपासून निघालेल्या शंभू महादेवाच्या डोंगर रांगेतल्या शेवटच्या मोठ्या सुळक्यावर हे ऐतिहासिक गाव आहे.
शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या गावाजवळील बाणूरगड (जुने नाव भूपालगड) किल्ल्याला अनन्य साधारण महत्व होतं. अदिलशाहीचा इतिहास लिहिणाऱ्या महम्मद झुबेरी याने ‘बुसातीन उस सलातीन’ या १८२४ लिहिलेल्या ग्रंथात या किल्ल्याविषयी माहिती आहे. स्वराज्याच्या सीमारक्षणेच्या दृष्टीने छत्रपती शिवरायांनी मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर एक मजबूत किल्ला बांधून त्यास भूपाळगड नाव दिले. तर एका लोककथेनुसार भूपालसिंह राजाने हा गड बांधला म्हणून या गडाचे नाव पडल, भूपाळगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अफझलखानाच्या वधानंतर हा किल्ला शिवछत्रपतींच्या ताब्यात आला. नंतर त्यांनी त्याची डागडुजी केली. भूपाळगडाची किल्लेदारी फिंगोजी नर्साळा यांच्याकडे होती. शिवाय शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वासू गुप्तचर बहिर्जी नाईक यांची समाधी देखील येथे आहे असे सांगितले जाते. या किल्ल्या शेजारीच बाणूरगड गाव आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोना जगाच्या कोना कोपऱ्यात पोहचला. पण, तेराशे - साडे तेराशे लोकसंख्येच्या या गावात कोरोनाचा शिरकाव होऊ शकला नाही. हे गाव डोंगराळ भागात आहे म्हणून इथे कोरोना पोहचू शकला नाही असे नाही. तर या गावाने मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसुत्रीचा वापर अत्यंत काटेकोरपणे करून अगदी गेल्या वर्षांच्या सुरुवातीपासूनच कोरोनाला प्रवेश करू दिलेले नाही.
याबाबत सरपंच सज्जन बाबर म्हणाले, 'आम्ही सुरुवातीपासूनच कोरोना बाबत सगळ्या गावात योग्य प्रबोधन केले. गेल्यावर्षी सगळीकडे कोरोना महामारीची पहिली लाट आली होती तेंव्हापासून आम्ही नियमितपणे कोरोना प्रतिबंधक सर्व नियम पळत आलो आहोत. गावात कोणी पाहुणा जरी आला तरी आम्ही त्याची लगेच कोरोना चाचणी करुन घेतो.'
लसीकरणाबाबत सरपंच सज्जन बाबर यांनी सांगितले ' आम्ही ४५ आणि ६० वर्षांच्या वरच्या सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. जरा जरी शंका आली तरी आम्ही संबंध गाव सॅनिटायझेशन कार्यक्रम राबवतो. येथील ग्रामस्थ सुद्धा शासनाचे सगळे नियम पाळताना दिसतात.
तसेच सरपंचांनी 'उपसरपंच कांताबाई गायकवाड यांनी सर्व महिला मंडळींमध्ये कोरोना बाबत जागृती केली आहे. ग्रामसेवक विनय थोरवत, ग्रामदक्षता समिती आणि सगळ्या ग्रामस्थांमुळे आज पर्यंत आम्ही कोरोनाला गावात शिरु दिलेले नाही. यापुढेही हाच निर्धार आहे.' असे सांगत कोरोना वेशीवरच थोपवण्याचे श्रेय लोकांना आणि लोकप्रतिनिधींना दिले.