Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नाखिंड नेढे एक स्वर्ग अनुभूती.....

 नाखिंड नेढे एक स्वर्ग अनुभूती.....

     

                              लेखक-विकास झांजे

"भासतोस नितांतसुंदर कधी तू रौद्र

अनेक रूपे तुझी लिलयाही तुझ्या थोर

कधी बेलाग कड्यात कधी खोल दरीत

सुळक्यात कधी नेढ्यातुनी तू आरपार"

   


 

ह्या चार ओळीतले वर्णन फक्त सहयाद्रीसाठी पण ते ही अपुरे पडावे. ह्या सह्याद्रीबद्दल अजून काय बोलावे किती लिहावे व कसे वर्णांवे माझे शब्दही तोकडे पडते. सह्याद्री पहायला व अनुभवायला अवघा जन्म जरी खर्ची केला तरीही अपुराच. निसर्गानेही ह्या सहयाद्रीवर मुक्तहस्ताने हजारो रंगाची जी उधळण केली आहे ते सौंदर्य पाहिल्यावर आपलं ही आयुष्य उजळून निघते. जणू परिसापरी ह्या सह्याद्रीचा आपल्यास स्पर्श होतो व आपले अवघे आयुष्य सुंदर बनते. हा सह्याद्री आपणास विराट , अथांग , बेलाग , अचाट , नितांत सुंदर व रौद्र अशा अनेक रुपात दिसतो. हजारो वर्षांपूर्वी ह्या सह्याद्रीची निर्मिती होत असताना अनेक शिखरे , डोंगररांगा दऱ्या खोरे,  वेडीवाकडी आकाराचे डोंगर तयार झाले त्यात काही डोंगरात नेढे तयार झाले. 

नेढे म्हणजे काय ते पाहू?

सह्याद्रीची निर्मिती होत असताना काही डोंगरात कठीण भागाबरोबरच ढिसूळ भागही तयार झाले त्यानंतर ह्या भागात प्रचंड वारा व मुसळधार पावसाने प्रहार केल्यावर काही कातळ दगड खाली कोसळले काहींची नैसर्गिकरित्या झीज झाली  त्यामुळे त्या डोंगराला आरपार असे छिद्र पडले गेले ते भलेमोठे छिद्र म्हणजेच नेढे होय.

 

रायगड जिल्यातील माथेरान डोंगररांगेतील समुद्र सपाटीपासून साधारण २१०० फूट उंच असलेले एक नेढे म्हणजे "नाखिंड नेढे". माझ्या अगदी लहानपणापासून मला ह्या नेढ्याबद्दल कुहूतुल होतं. कारण हे नेढे माझ्या गावातून अगदी स्पष्ट दिसते. मी विचार करायचो या डोंगराला हे दोन छिद्र कोणी पाडले असतील कसे पडले असतील. त्याची उत्तरे ही मला या सहयाद्री भटकंती ने मिळाली. मुंबई-पुणे लोहमार्गाने पश्चिमेकडे एक डोंगररांग दिसते ती म्हणजे माथेरान डोंगररांग याच रांगेत दोन भलेमोठे छिद्र असलेले हे नेढे दिसून येते. नाखिंड नेढेला यायचं असल्यास मध्यरेल्वेच्या वांगणी स्थानकावर उतरावे. समोरच आपल्याला माथेरानची डोंगररांग दिसते. पश्चिमेस जिना उतरून बेडीस गावासाठी रिक्षा पकडावी दरडोई दहा रुपये इतकं भाडं आकारले जाते. हे अंतर साडेतीन किमी इतके आहे. आपण आपल्या खाजगी वाहनाने कर्जत-कल्याण हायवेवरून आल्यास पेट्रोल पंपाच्या बाजूने गेलेल्या रस्त्याने जावे. बेडीस गावात गेल्यावर समोरच नाखिंड नेढेचा अजस्त्र असा डोंगरकडा दिसू लागतो. नाखिंड नेढेला जाण्यास आपल्याला दोन टप्पे पार पाडावे लागते पहिला बेडीस गाव ते वाघिणीची वाडी हे अर्ध्या तासचं अंतर आहे. तसेच आपल्या चालीवरही हे अवलंबून आहे. वर जाणारी वाट ही अतिशय ठळक आहे त्यामुळे चुकण्याची तसुभर ही शक्यता नाही. वाघिणीच्या वाडीतील लोक उदरनिर्वाहासाठी वांगणी व इतर परिसरात जात येत असतात. हा टप्पा पार करण्यास फार अडचण येत नाही कारण सभोवताली झाडांचं प्रमाण बऱ्यापैकी चांगले आहे. वाटेत काही जंगली झाडे, करवंद , मोहाची झाडे आपला मार्ग सुकर करतात. अर्ध्यातासाची चढाई केल्यावर आपण पन्नास घरांची वस्ती असलेल्या वाघिणीच्यावाडीत येऊन पोहचतो. येथून डोंगररागेचे विलक्षण दर्शन होते. हे छायाचित्र आपल्या कॅमेरात जरूर टिपावे. पुढची वाट ही या वाडीमधूनच गेलेली आहे. येथे दोन दुकाने ही आहेत खायचं प्यायचं आपल्या बरोबर घ्यावं . तसेच पाण्याचे बॉटल ही भरून घ्याव्या. कारण नेढ्यावर पाण्याचे कोणतेही स्तोत्र नाही. या वाडीत शाकाहारी तसेच मांसाहारी जेवणाची सोय होऊ शकते. ह्या वाडीतील भगवान वाघ हा वाटाड्या तसेच जेवणाचीही सोय करतो. एक गोष्ट सांगावीशी वाटते ते म्हणजे ह्या गावातील लोक फार चांगले आहेत. तुम्हाला कुठलीही मदत करायला तयार असतात शिवाय येथे आलेल्या पर्यटकांशी आपुलकीने वागतात. आपणही त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. तसेच ह्या वाडीत मागील तीन वर्षांपासून लाईट आली या आधी येथील लोक ही कंदील व बत्तीच्या साहयाने प्रकाशाची व्यवस्था करीत असे. इतकी वर्षे विना विजेचे हे लोक कसे राहिले असतील. आता मात्र दुसरा टप्पा सुरू होतो तो म्हणजे वाघिणीचीवाडी ते नेढे हे एक तास अंतराचे पण खड्या चढाईचं. जर तुम्ही नवखे असाल तर सोबतीला वाटाड्या जरूर घ्या. कारण हा टप्यात आपण चुकण्याची शक्यता आहे. वाडी सोडल्यावर समोर एक वीज कोसळून जळालेले आंब्याचं झाड दिसेल तेथूनच सुरुवात करावी पुढे अजून आंब्याची दोन झाडे लागतील तेथून थोडं माळरान लागते. एक पायवाट पुढे विहिरीच्या दिशेने गेली आहे तिकडे न जाता सरळच चालावे वाटेत भलेमोठे दगड आहेत हे आपण लक्षात ठेवा. पाच मिनिटं नंतर आपण जंगलात प्रवेश करतो. ही वाट मात्र थरारक आणि उभ्या चढाईची व घनदाट झाडीनी वेढलेली आहे. पुढे एक धबधबा लागेल . इथेही दोन वाटा गेल्या आहेत. इथे जर का तुम्ही चुकलात तर ह्या जंगलात हरवून जाल. हा धबधबा पार करून सरळ डाव्या दिशेने धबधबा चढून जा. मग पुढे थोडी मळलेली पायवाट लागेल ही पायवाट मात्र काही झाले तरी सोडायची नाही. कारण घनदाट झाडीमुळे येथून नाखिंड नेढे दिसत नाही त्यामळे आपल्याला नक्की कुठे चाललोय हे कळत नाही. ही एकमेव पायवाट नेढेपर्यंत जाते. वाटेत जात असताना विविध पक्षाचें मधुर आवाज तसेच काही पाखरांची किर्र असे आवाज ऐकत मध्येच एखादी वाऱ्याची मंद झुळूक घेत हे सर्व अनुभवत पुढे मार्गक्रमण करत रहावे. ह्या जंगलात अनेक जंगली व काटेरी झाडे तसेच विशेष म्हणजे रानटी केळीची पुुष्कळ झाडे पहायला मिळतात. तासाभराच्या खड्या चढाई नंतर मात्र आपण डोंगररांगेवर पोहचतो. तेथून समोरच  दिसणाऱ्या किल्ले चंदेरी व भोवतालच्या मनोहारी दृश्य पाहून आपण इथंवर येण्यासाठी जे कष्ट घेतले आहेत त्याच चीज झाल्यासारखे वाटते. पापण्या न लवता हे दृष्य आपल्या मनात साठवावं. येथून पुढे खरा थरार सुरू होतो. कारण पुढे दोन्ही बाजूस खोलवर गेलेली दरी व चिंचोळ्या आकाराची पायवाट असा प्रवास सुरु होतो. समोरच्या पायवाटेवर आपलं लक्ष केंद्रित करून चालावं. पावसाळ्यात दुतर्फा गवत वाढले असल्याने तर अधिक जपून चालावे. दोन तीन चढाव पार केले की आपल्याला समोरच नाखिंडचा अजस्त्र असा कातळकडा नजरेस येतो. तो पाहताच क्षणी त्याची भव्यता समजते. ह्या कड्याच्या डाव्या बाजूने चालावे. पुढे लगेचच आपल्याला २०x१० फूट आकाराचे व दहा फूट उंचीचे एक भलेमोठे नेढे लागते. ह्या नेढ्यात वरच्या भागातील पाच सहा मोठे दगड खाली पडलेले दिसतात. ह्या ठिकाणी आल्यावर मात्र क्षणभर विश्रांती घेण्यासाठी ह्या नेढ्यात निवांत पडावं. समोर दिसणारं विहंगम दृश्य पाहत थोडा वेळ येथे निर्सगाच्या सानिध्यात रममाण व्हावे. सोबत काही खायला आणलं असेल तर ते खाऊन आणि पाणी पिऊन चढाई करून आलेला क्षीण घालवावा. येथे मात्र कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये. हे नेढे व्यवस्थित पहावं ह्याची निर्मिती कशी झाली असावी हे आपणच अभ्यासावं. हे मोठे नेढे पाहिल्यावर पुन्हा डाव्या बाजूने खाली उतरावे. थोडे पुढे चालत गेल्यावर अजून एक नेढे दिसते. इथे जायला मात्र थोडी कसरत करावी लागते साधारण पंधरा फूट उंचीचा हा कडा सावधपणे चढा. वर चढल्यावर मात्र आपल्याला पुढे पाय ठेऊन चालता येईल एवढीही जागा नाही. मग पुढे जाण्यासाठी थोडे बाहेर आलेल्या कड्यावर बसावे. नंतर आपल्या हातावर जोर देत हळूहळू पुढे सरकावे हे करताना आपला तोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. हा टप्पा पार केल्यावर नेढ्यात जाणं सोप्प नाही कारण नेढे उंचीने फक्त दीड फूट इतकेच आहे. पुढे जाण्यासाठी आपलं शरीर जमिनीला समांतर ठेऊन खाली हात टेकत टेकत जावं. हा अनुभव नक्कीच घ्या. आत शिरल्यावर मात्र हे नेढे १५x१५ फूट इतक्या मोठ्या आकाराचे दिसते. येथील दगड हा मुरमाड स्वरूपाचा आहे ह्या नेढ्याची निर्मिती कशी झाली असेल हे ही बारकाईने पाहिल्यास आपल्या लक्षात येईल. समोरून मोठे व पाठीमागे लहान होत गेलेले हे नेढे वाऱ्याच्या प्रचंड वेगाने येथील दगडांची झीज झाली व ह्या प्रकारचे नेढे तयार झाले. ह्या ठिकाणी अप्रतिम अशी फोटोग्राफी ही करता येते अर्थातच तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून. येथे यायला समोरूनही रस्ता आहे पण पुढे खूप खोल दरी आहे आणि आधारालाही काही नाही म्हणून नेढ्याच्या डाव्याबाजूनेच यावे. हे पाहिल्यावर जेथून आलो होतो तेथूनच पुन्हा तशाच प्रकारे खाली उतरावे. हे दोन्ही नेढे पाहिल्यावर समोर एक चाळीस फुटी उंच खिंड दिसेल ती चढल्यावर समोरच्या डोंगरावरून विकटगडालाही जाता येते. खूप सारे ट्रेकर्स नाखिंड व विकटगड असा ट्रेक करतात. पुन्हा उजवीकडे वळून १५ फुटी कातळकडा चढून वरच्या दिशेला जावे मग आपण नाखिंडच्या सर्वात उंच असलेल्या भागात पोहचतो. येथे वर चढताना कातळात पाय ठेवण्यासाठी खाचे ही केले आहेत. वर आल्यावर भोवतालचं परिसर पाहिल्यावर मात्र आपलं भान हरपायला होतं. कारण येथील आपल्या अंगावर येणारा भन्नाट वारा व येथून दिसणारा प्रचंड असा मुलुख आपल्या नजरेस येतो. जर वातावरण स्वच्छ असेल तर पूर्वेस व अग्नेय दिशेस नागमोडी वळणे घेत वाहणारी उल्हास नदी तिच्या पाठीमागे भिमाशंकर डोंगररांग व कर्जत डोंगररांग, लोणावळा डोंगररांग त्या रांगेतील राजमाची, ढाक,भिवगड,कोथळीगड, पदरगड,भीमाशंकर,गोरखगड ,मच्छिंद्र गड इतका प्रदेश दिसतो. उत्तरेस व ईशान्य दिशेला खंडोबा मंदिर, माहुली, कल्याण भिवंडी, पश्चिमेस व वायव्येस चंदेरी, म्हैसमाळ, श्रीमलंगगड, ताहुली, नवरा नवरी सुळके, गाडेश्वर धरण , प्रबळगड, कलावंतीण,इर्शाळगड, कर्नाळा इतके किल्ले व पनवेल, मुंबई  भूभाग दिसतो. व दक्षिणेकडे व नैऋत्य दिशेला माथेरान, विकटगड, पाली भूतवली धरण दिसते. म्हणजे जवळजवळ सोळा किल्ले येथून दिसतात. फक्त तुम्ही वातावरण स्वच्छ असेल तेव्हांच आले तर हे सर्व दिसेल. तसेही सात तरी किल्ले दिसतात. ह्या नेढ्यात फार काही पाहण्यासारखं नसलं तरी मात्र येथून दिसणाऱ्या विस्तृत प्रदेशातील ठिकाणे ह्या सफरीला चार चांद लावतात. मग काय? सध्या कोोरोनाचा काळ  आहे.तुम्हांला सफर घडवून आणली म्हणून घरीच राह आणि सुरक्षित राह!!

(लेखक हे गड किल्ल्यांचे ट्रेकर आहेत.)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies