भास्करराव जाधव यांचा आक्रोश पाहून सारेच हेलावले..! - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Saturday, April 24, 2021

भास्करराव जाधव यांचा आक्रोश पाहून सारेच हेलावले..!

 भास्करराव जाधव यांचा आक्रोश पाहून सारेच हेलावले..!

               ओंकार रेळेकर-चिपळूण

जवळजवळ ७०-८०  माणसांचं कुटुंब एकत्र ठेवणं आणि कसे एकत्र आहे याचाच उल्लेख श्री. भास्करराव जाधव हे नेहमी गौरवानं करतात. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनीसुध्दा ज्यावेळेस ते भास्करराव जाधव यांच्या घरी आले होते त्यावेळेस त्यांच्या कुटुंबाचा भलामोठा एकत्रित फोटो पाहून ‘तुमचं एवढं मोठं कुटुंब आहे?’ असे मोठया आनंदाने विचारले होते.

          काल, शुक्रवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळपासून नेहमीप्रमाणे अनेकांचे फोन श्री. भास्करराव जाधव यांना येत होते. कोणी सांगत होतं, हाॅस्पीटलला बेडची व्यवस्था करा, कोणी अॅम्ब्युलन्स,  रेमडेसिवीर इंजेक्शन मागत होता तर कोणी आॅक्सिजन मिळेल का,  याची चौकशी करत होता. या सर्वांना शांतपणे उत्तरे देवून ते प्रत्येकाची अडचण दूर करीत होते. कुणाची कामथे उपजिल्हा रूग्णालयात, कुणाची रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रूग्णालयात तर कुणाची खासगी हाॅस्पीटलला ते अगदी मुंबईपर्यंत उपचारांची व्यवस्था ते करीत होते. इतक्यात त्यांचे छोटे बंधू श्री. सुनील भाऊराव जाधव यांची कन्या नीलम स्वरूप शिर्के ही आली आणि भास्कररावांच्या कुशीत शिरून तिने ‘देवाने असे का केलं?’ म्हणत हंबरडा फोडला आणि ते ऐकून भास्कररावांचाही बांध फुटला. अनेकांना धीर देणारे, शांत करणारे,  संयम ठेवा सांगणारे भास्करराव ओक्साबोक्सी रडू लागले आणि सगळेच अक्षरशः हेलावून गेले. तिथे असलेल्या डाॅक्टर, वैदयकीय कर्मचारी आणि जमलेल्या सहकाऱ्यांनाही अश्रू आवरता आले नाहीत.

            श्री. सुनील जाधव हे श्री. भास्करराव जाधव यांचे सख्खे छोटे बंधू. लोटे औदयोगिक वसाहतीतील प्रसिध्द उदयोजक व उदयोजक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील शिर्के यांचे सुपुत्र श्री. स्वरूप शिर्के हे श्री. सुनील जाधव यांचे छोटे जावई. स्वरूप गेले १५ दिवस कोरोनाशी झुंज देत होते. त्यांच्या उपचारांसाठी डाॅक्टरांनी जे जे सांगितलं ती ती औषधे व प्रत्येक  गोष्ट भास्करराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपलब्ध करून आणली. परंतु, शेवटी कोरोनानेच या सर्वांवर मात केली आणि स्वरूप यांनी काल सकाळी अखेरचा श्वास घेतला.

          गेले १५ दिवस श्री. भास्करराव जाधव यांचा मोठा मुलगा समीर, छोटे बंधू श्री. सुनील जाधव यांचा मोठा मुलगा योगेश, बहिणीचा मुलगा चिराग घाग आणि चुलत जावई स्वरूप शिर्के हे कोरोनाशी झुंज देत होते. परंतु, श्री. भास्करराव यांनी चुकूनदेखील याविषयीचं आपलं दुःख आणि कौटुंबिक अडचण ओठावर येवू दिली नाही. आपले दुःख व अडचण सांगून उपचारांच्या मदतीचं काम थांबवलं नव्हतं. त्यांची लोकांची सेवा व उपचारांसाठीची मदत अव्याहतपणे सुरू होती. परंतु, श्री. स्वरूप शिर्के यांच्या जाण्याने आज जाधव व शिर्के ही दोन्ही कुटुंबं उध्वस्त झालेली आहेत.

भेटायला येवू नका, मदतकार्य मात्र सुरूच राहिल: भास्करराव जाधव

नात्यागोत्यासह सर्व कुटुंब मी एकत्र राखलं. त्याचा मला खूप अभिमान वाटत असे. माझ्या कुटुंबाला कोणाची तरी नजर लागली, अशा भावना श्री. भास्करराव जाधव यांनी दु:खी मनाने व्यक्त केल्या. त्याचवेळी त्यांनी सर्वांना आवाहन केले की, ‘आपल्याला लागेल ती मदत करण्याकरता मी कुठेही कमी अथवा कसूर करणार नाही. परंतु, गेले ४  दिवस मी माझ्या जीवाची पर्वा न करता स्वतःच हाॅस्पीटलमध्ये वारंवार जात होतो. तिथे तासनतास  थांबून जावई व मुलांच्या उपचारांची माहिती घेत होतो. त्यामुळे पुढील  ४-५ दिवस कोणीही मला भेटायला येवू नये,  अशी सर्वांना विनंती आहे. आपल्या सर्वांची सुरक्षितता माझ्यासाठी महत्वाची आहे. माझ्यामुळे कोणालाही त्रास होवू नये हीच यामागची भावना आहे. माझ्यावर व आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला तरी या संकटकाळात उपचारांसाठीची मदत मात्र थांबणार नाही. ती अखंडपणे सुरूच राहिल.’

No comments:

Post a Comment