Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पाषाणे ग्रामपंचायतमध्ये गैरकारभार

 पाषाणे ग्रामपंचायतमध्ये गैरकारभार

  •  अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद, ग्रामसेवकांवर अंशतः कारवाई ? 
  • ग्रामपंचायत सरपंच सदस्यांवर कारवाई कधी ? 
  • चौकशीत तारीख पे तारीख

 दिपक पाटील -कर्जत


                      कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार या प्रकारांची चौकशी देखील झाली. आणि आरोप खोटा नसल्याचे सिद्ध झाले झाले. मात्र केवळ ग्रामसेवकांवर अंशतः कारवाई करत प्रशासनाने कारवाईचा दिखावा केला मात्र याबाबत अजूनही चौकशी सुरूच असून "तारीख पे तारीख" प्रकार सुरु आहे. तेव्हा ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्यावर कारवाई केव्हा असा प्रश्न उपस्थित होत असून चौकशीत दिरंगाई होत असल्याने यात अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे चित्र आहे. 


            कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक व ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेली पाषाणे ग्रामपंचायतीमध्ये गैरव्यवहार, भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. गावातील रामदास नामदेव धुळे, जनार्दन गोपाळ म्हसकर, जगदीश हरिश्चंद्र विशे, जयराम पुंडलिक धुळे हे यातील तक्रारदार आहेत. तक्रारदार यांनी याबाबत पुरावे जमा करत ऑगस्ट २०२० मध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार पाषाणे ग्रामपंचायतीने मौजे पाषाणे येथील कमान  ते राईस मिल व राईस मिल ते दुर्गामाता रस्ता, लोखंडी बाकडे खरेदी, पथदिवे खरेदी, कॅशबुक मध्ये खाडाखोड, हायमास्ट खरेदी, गणपती घाट बांधकाम, तलावास संरक्षण भिंत, गणेश घाट रस्ता, खडकवाडी येथील पाण्याच्या टाकीच्या संरक्षण भिंतीच्या नावाखाली ग्रामसेवकांनी स्वतःच्या बंगल्याला बांधलेली भिंत, खडकवाडी येथील पेव्हर ब्लॉक रस्ता, तलावातील गाळ काढणे, आदी गोष्टींबाबत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुशंघाने जिल्हा परिषदेच्या उप मुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांनी खालापूर पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी एम.जी.शिंदे यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार शिंदे यांनी २३ ऑक्टोबर २०२० रोजी पाषाणे ग्रामपंचायतमध्ये प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. यावेळी तक्रारदार यांच्यासह सरपंच गोटीराम वाघ व विद्यमान ग्रामसेवक प्रवीण पेमारे हे उपस्थित होते. या चौकशी नंतर दोन्ही बाजू अधिकारी शिंदे यांनी ऐकून पडताळून घेतल्या. त्यानंतर चौकशी अधिकारी यांनी आपला अभिप्राय हा जिल्हा परिषदेला पाठविला होता. या अभिप्रायानुसार रस्त्यांच्या कामांबाबत तांत्रिक मुद्दे असल्याने त्यांनी राजिप बांधकाम उपविभाग उपअभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता यांचा अभिप्राय घेण्याचे सुचविले. तर बाकडे खरीदीचे साहित्य १ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याने त्याची शासन निर्णयाप्रमाणे इ निविदा करणे आवश्यक असताना त्या ग्रामपंचायत स्तरावर खरेदी केल्या. पथदिवे सुद्धा इ निविदा करणे आवश्यक असताना त्या ग्रामपंचायत स्तरावर खरेदी केले. कॅशबुक मध्ये तफावत जरी नसली तरी त्यात खाडाखोड केल्याने व्हाईट्नर वापरले गेले आहे. तर लाखो रुपयांचे हायमास्ट खरेदी केले गेले मात्र त्यासाठी ई निविदा प्रक्रिया आवश्यक असताना ते ग्रामपंचायत स्तरावर खरेदी केले गेले आहेत. असा अभिप्राय चौकशी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेला पाठविला होता. त्यामुळे तक्रारदार यांच्या आरोपात तथ्य असल्याचे सिद्ध झाले मात्र त्यानंतर केवळ ग्रामसेवकांवर अंशतः कारवाई करून ग्रामपंचायत बॉडीला मोकळे सोडले गेले आहे. लाखो रुपयांचा ग्रामनिधी यात वापरला गेला असून शासन निर्णयांचा भंग झाला असल्याचे उघड आहे. मात्र असूनही याबाबत चौकशीच सुरु असल्याचे समजते. तर या प्रकरणात चालढकल कारभार सुरु आहे. तेव्हा जिल्हा परिषदेच्या या चालढकल कारभार कधी संपणार असा प्रश्न निर्माण झाल्याने तक्रारदारांकडून संताप व्यक्त होत आहे.  

   

याबाबत जिल्हा परिषदेची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सदर विषय ग्रामपंचायतीशी संबंधित असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला. मात्र अनेक दिवस भ्रमणध्वनी वरून ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचललाच नाही त्यामुळे याबाबत जिल्हा परिषदेची नेमकी भूमिका समजू शकली नाही.     

ऑगस्ट २०२० रोजी आम्ही पाषाणे ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराबाबत तक्रार दिली होती. त्यानुसार चौकशी अधिकारी नेमून याबाबत चौकशी झाली. आमच्या आरोपात तथ्य असल्याचे चौकशी अहवालात देखील निष्पन्न झाले. या गोष्टीला १ वर्ष होत आले. मात्र तरीही अधिकारी वर्गाकडून ग्रामपंचायतीवर कारवाई करण्यास दिरंगाई होत आहे. यात राजकीय दबाव असल्याने अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामपंचायतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्चून कामे केली मात्र गावासाठी फिल्टर प्लांट ग्रामपंचायत बसवू शकली नाही. आजही आम्ही गढूळ पाणी पितो. 

जनार्दन म्हसकर, तक्रारदार पाषाणे

 याबाबत मागील वेळेसच चौकशी करण्यात आली होती. आणि त्या चौकशी अहवालावरून पाषाणे ग्रामपंचायतमधील तत्कालीन ग्रामसेवक हरिश्चंद्र निरगुडा, अशोक रौनदळ यांच्यावर कारवाई करून त्यांची वेतनवाढ थांबविण्यात आली होती. 

धनसिंग रजपूत, उपगटविकास अधिकारी पंचायत समिती कर्जत  

आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यानुसार चौकशी झाली आहे आणि अजूनही होत आहे. आम्ही या चौकशीला सामोरे जात आहोत. तेव्हा जो काही निर्णय येईल तो पाहूया.

गोटीराम वाघ, सरपंच पाषाणे ग्रामपंचायत

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies