काँग्रेसच्या मूळ विचारधारेपासून दूर गेलेल्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील : भानुदास माळी
ओंकार रेळेकर-चिपळूण
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच विभागांना पक्ष वाढण्याच्या निर्देश दिले आहेत. यानुसार काँग्रेसच्या मूळ विचारधारेपासून दूर गेलेल्या बारा बलुतेदारांसह इतर घटकांना पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मेहनत घेणार आहोत. यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळेल तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची इच्छा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली असून त्यानुसार आम्ही कामाला लागलो आहोत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी चिपळुणात शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
चिपळूण दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांचे कापसाळ येथील शासकीय विश्रामगृहात तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांच्यासह ओबीसी विभाग माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, प्रदेश पदाधिकारी इब्राहिम दलवाई, माजी उपनगराध्यक्ष रतन पवार, तालुका प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष अन्वर जबले, सेवादल तालुकाध्यक्ष अश्फाक तांबे, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष महेश कदम, शहराध्यक्ष फैसल पिलपिले, अनुसूचित जाती जमाती विभाग रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, गुलजार कुरवले, संजय जाधव, साजिद सरगुरोह, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष ऋषिकेश शिंदे, सर्फराज घारे, सेवा महिला जिल्हाध्यक्षा निलम शिंदे, सेवादल युवती जिल्हाध्यक्ष भक्ती कुडाळकर, सेवादल तालुकाध्यक्षा स्नेहा आंबले, अश्विनी भुस्कुटे, नंदा भालेकर, श्रद्धा कदम आदींनी स्वागत केले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
- काँग्रेसच्या मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्यांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील
- यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी काँग्रेसचे ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सर्वच विभागांना पक्ष वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. यानुसार आम्ही पक्ष वाढीच्या कामासाठी लागलो आहोत. देशात काँग्रेसने ६०-७० वर्षे राज्य केले. तळागाळापर्यंत काँग्रेस पोहोचली. मात्र, मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या बारा बलुतेदारासह अन्य घटक मूळ प्रवाहापासून दूर गेला आहे. या सर्वांना काँग्रेसपासून दूर करण्याचे कारस्थान करण्यात आले. यामुळे काँग्रेस पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षात गेले. यामुळे पक्षाची ताकद विखुरली गेली. बारा बलुतेदार हेच काँग्रेसचे खरे मतदार आहेत. या बारा बलुतेदारांना पक्षाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यावर जबाबदारी सोपवली आहे. आम्ही शाहू, फुले, आंबेडकर अनुयायी असून पुरोगामी विचारसरणीचे आहोत. या विचारसरणीला अनुषंगाने आम्ही पक्ष वाढीच्या कामाला सुरुवात केली आहे.
- कोकण दौरा उरण पासून कोकण दौऱ्याला सुरुवात केलेली आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात असून उद्या सिंधुदुर्ग नंतर विदर्भ मराठवाड्याचा दौरा करणार आहोत. या दौऱ्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संघटन मजबूत साठी आमचे विशेष प्रयत्न असणार आहेत असे भानुदास माळी यांनी यावेळी स्पष्ट केले.
- ओबीसी शिष्यवृत्ती काँग्रेसमुळेच* या दौऱ्याच्या माध्यमातून काँग्रेस ओबीसी साठी कसे काम करीत आहे व केले आहे याची माहिती ओबीसी घटकापर्यंत पोचवण्याचे काम प्रसिद्धिमाध्यमांशी द्वारे केले जाणार आहे असे यावेळी नमूद केले यामध्ये ओबीसी शिष्यवृत्ती माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीत सुरू झाली आणि आजही ती सुरू आहे. सध्याची शिष्यवृत्ती १ हजार १३० कोटी रुपये असून ती लवकरच दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महाज्योती या योजनेच्या माध्यमातून ओबीसी वर्गातील उच्चशिक्षित विद्यार्थ्यांसाठी आर्थिक खर्चाचे धोरण अवलंबण्यात आले आहे. याचबरोबर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाकरिता आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय झाला असल्याचेही देखील या वेळी सांगितले.
- ओबीसी शैक्षणिक आरक्षण कायम ओबीसी राजकीय आरक्षणाला धक्का बसला असला तरी शैक्षणिक आरक्षण कमी झालेली नाही. हे ओबीसी घटकाने समजून घेतले पाहिजे. ओबीसी राजकीय आरक्षण आणखी वाढवून मिळावे यासाठी जनगणना होणे आवश्यक आहे. याकरिता काँग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, भाजप याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप भानुदास माळी यांनी यावेळी केला. भाजपच्या खासगीकरण धोरणामुळे नोकरी क्षेत्रात आरक्षण संपुष्टात आल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक क्षेत्राचे खासगीकरणाचा घाट भाजपने घातला असल्याचा आरोप यावेळी केला. कोविड परिस्थितीमुळे कुंभार, नाभिक अन्य समाज घटकांची काय अवस्था झाली आहे ? त्याचे आपणा सर्वांना जाणीव आहे. या सर्वांमध्ये काँग्रेस पक्ष आपला तारणहार आहे याची जागरुकता करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार दौरा सुरू आहे. या सर्वांना काँग्रेसच्या मूळ प्रवाहात नक्कीच आणले जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
- लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार आगामी निवडणुकांचा कालावधी पाहता काँग्रेस पक्ष संघटन मजबूतीकडे आम्ही लक्ष दिले असून पुढील काळात काँग्रेस लोकसभा, विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याची इच्छा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली असून तसा आदेश पक्षश्रेष्ठींचा असल्याचे ते सांगण्यास विसरले नाहीत. भविष्यकाळात काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत असे भानुदास माळी यांनी यावेळी स्पष्ट केले. सध्या महागाई देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे. डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडरचे दर दिवसेंदिवस वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य घटकाला जगणे मुश्कील झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये भाजप विषयी प्रचंड नाराजी आहे. हाच विषय घेऊन भाजपच्या विरोधात रणकंदनदन केले जाईल. याचबरोबर काँग्रेस हाच भाजपला पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
- मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे.मोदी सरकारने खासगीकरणाचे धोरण अवलंबले असल्याने नोकरी क्षेत्रात आरक्षण बऱ्यापैकी संपत चालले आहे. मराठा समाजात गरीब लोकं देखील आहेत. या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असून मराठा समाज आमच्या मोठा बंधू आहे असे ते यावेळी म्हणाले.
- ओबीसी घटकासाठी काय करणार आहात? याचा प्लॅन दाखवा* छत्रपती संभाजीराजे म्हणतात की, बहुजन समाज सोबत आला तर आपण पक्ष काढण्याच्या विचारात आहोत. मात्र, बहुजन समाजासाठी तुम्ही काय करणार आहात ? याचा प्रोग्राम दाखवा नंतर पक्ष काढण्याचा विचार करा, असे श्री. माळी यांनी यावेळी सांगितले.