कोरोना शहरात आणि पालिकेचे अधिकारी, कर्मचारी पन्हाळ्यात - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Tuesday, June 15, 2021

कोरोना शहरात आणि पालिकेचे अधिकारी, कर्मचारी पन्हाळ्यात

 कोरोना शहरात आणि पालिकेचे अधिकारी, कर्मचारी पन्हाळ्यात

पालिकेच्या अधिकारी, कर्मचार्यांच्या पार्टीची शहरात चर्चा

               उमेश पाटील सांगलीएकीकडे आष्टा शहरात कोरोना वाढत असताना आष्टा पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पन्हाळा येथे जाऊन केलेल्या पार्टीची शहरात जोरदार चर्चा असून या पार्टीची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आष्टा शहर  शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यानिमित्ताने शहरात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचे गांभीर्य पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  याबाबतचे निवेदन तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष राकेश आटुगडे, शहर संघटक नंदकिशोर आटुगडे, स्वप्नील माने,गजानन दाटिया उपस्थित होते.

   आष्टा शहरात दररोज पंधरा ते पंचवीस नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. शहरात जवळपास 850 हून अधिक जणांना कोरोना ची लागण झाली होती. यातील काहीजण बरे झाले आहेत तर काहीजण उपचार घेत आहेत. पालिका प्रशासनाच्या वतीने जुजबी उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे शहरात रुग्ण संख्या वाढत चालली आहे. पालिकेच्या अधिकार्‍यासह पदाधिकारीही रुग्ण संख्या कमी होण्यासाठी ठोस पावले उचलत असल्याचे दिसून येत नाही. परिणामी शहर वासियात पालिका प्रशासनाच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

  अशी परिस्थिती असताना पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी पन्हाळा गडावर जाऊन पार्टी केल्याची चर्चा शहरात जोरदार सुरू झाली आहे. एका अधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे सोमवारी ही पार्टी पार पडली. यावेळी अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे फोन बंद होते. याची कुणकुण शिवसेनेला लागली. शिवसेनेचे आष्टा शहर प्रमुख राकेश आटुगडे आणि शहर संघटक नंदकिशोर आटुगडे यांनी तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची भेट घेऊन शहरात सुरू असलेल्या चर्चेची कल्पना दिली तसेच या प्रकरणात सत्य असल्यास संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही केली.

   या विषयी बोलताना नंदकिशोर आटुगडे म्हणाले, कोरोना सारख्या विषाणूने जगभरात थैमान घातले असताना तसेच आष्टा शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असताना आष्टा पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी एका अधिकाऱ्याच्या वाढदिवसाची पार्टी पन्हाळगडावर केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. सोमवार दिनांक 14 रोजी ही पार्टी पार पडली. या दिवशी आष्टा पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी कोठे होते याची चौकशी करून संबंधितावर कडक कारवाई करावी अन्यथा शिवसेना गप्प बसणार नाही, असा इशाराही शेवटी त्यांनी दिला.


No comments:

Post a Comment