सातारा येथील किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडली तिजोरी ! - महाराष्ट्र मिरर

Breaking


Post Top Ad

Wednesday, July 14, 2021

सातारा येथील किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडली तिजोरी !

 सातारा येथील किल्ले अजिंक्यताऱ्यावर सापडली तिजोरी ! 

स्वच्छता मोहिमेदरम्यान शोध : ब्रिटिशांकडून ठेवली जायची काडतुसे

            प्रतीक मिसाळ-सातारा


स्वराजाची राजधानी असलेल्या किल्ले अजिंक्यताऱ्याला सुमारे ९ शतकांचा इतिहास आहे . परंतु , या गडाला वैभव लाभले ते छ . शिवरायांचे नातू व साताऱ्याचे संस्थापक छ . शाहू महाराज ( थोरले ) यांच्या काळात . याच अजिंक्यताऱ्यावर राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत एक लोखंडी तिजोरी आढळली आहे . जाणकारांच्या मते ही तिजोरी ब्रिटिशकालीन आर्म बॉक्स म्हणजे बंदुकांची काडतुसे ठेवण्यासाठी असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे . दरम्यान , अशाच दोन लोखंडी तिजोरी चौथऱ्यानजीकच्या ढिगाऱ्यात असून , लवकरच त्या पेट्या बाहेर काढण्यात येणार आहेत . राजा शिवछत्रपती परिवाराकडून सध्या जिल्ह्यातील चार ते पाच गडांवर स्वच्छता मोहीम सुरू आहे . दि . ११ रोजी या परिवारातील जिल्हाध्यक्ष विशाल शिंदे व सदस्य किल्ल्यावरील मुख्य राजवाड्यानजीक स्वच्छता करीत असताना त्यांना एका चौथऱ्याचा एक भाग दृष्टिक्षेपात आला . उत्सुकतेपोटी या सदस्यांनी या चौथऱ्याची स्वच्छताही केली . याचदरम्यान चौथऱ्यानजीक असलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली असलेल्या लोखंडी पेटीचा काही भाग या सदस्यांना आढळला . सर्वांनी ही पेटी बाहेर काढली .

 त्यावेळी ही भक्कम बांधणीची पेटी अर्धवट ३० अंशाच्या कोनात उघड्या अवस्थेत होती आणि पेटी कौलांचे तुकडे व मातीने भरलेली होती . ही लोखंडी पेटी स्वच्छ केली असता तिची वेगळ्या अशा भक्कम बांधणीमुळे या पेटीचे नेमके प्रयोजन लक्षात येत नव्हते . १८१८ मध्ये मराठेशाहीचा अस्त झाल्यानंतर किल्ले अजिंक्यताऱ्याचा ताबा ब्रिटीशांकडे आला आणि त्यानंतर स्वातंत्र्य मिळेपर्यंत किल्ल्यावर ब्रिटीशांचा ताबा होता . याच कालावधीत किल्ल्याच्या संरक्षणासाठी असलेल्या ब्रिटीश फौजेकडील बंदुकीच्या काडतूसे ठेवण्यासाठी भक्कम अशा लोखंडी पेट्या खास आयात केल्या असाव्यात . या पेटीची बांधणी अत्यंत भक्कम अशा लोखंडी किंवा पोलादाच्या पत्र्यापासून केली असावी कारण दीडशे - दोनशे वर्षानंतरही या पेटीचा भक्कमपणा नजरेस येत आहे . शिवाय ही पेटी अंदाजे १०० ते १२५ किलो वजनाची असावी असा अंदाज आहे .

मुंबई संग्रहालयाकडे पत्रव्यवहार ... अजिंक्यतारा येथील चौथऱ्यानजीक ढिगाऱ्यात एक ब्रिटिशकालीन तिजोरी आहे . अजून एक तिजोरी असून , त्याठिकाणी आणखी काही ब्रिटिशकालीन वस्तू आढळण्याची शक्यता आहे . त्यामुळे मुंबई येथील संग्रहालय संचालकाकडे याबाबत पत्रव्यवहार केला आहे . त्याबाबत परवानगी आल्यास त्या परिसरात खोदकाम करून इतिहासकालीन वस्तू काढण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली .

No comments:

Post a Comment