घंटागाडीच्या गाण्यामुळे विरोधकांनी पालिकेचे अस्तित्व मान्य केले: उपनगराध्यक्ष मनोज शेंडे
प्रतीक मिसाळ सातारा
घंटागाड्यांच्या गाण्यांमुळे नगरपरिषदेचे अस्तित्व मान्य करताना त्यांनी स्वच्छता विकासाची अप्रत्यक्ष कबुली आपणहून दिली आहे . त्यांनी केलेल्या टिकात्मक सूचनांचा आदर करुन सातारकरांसाठी सातारा विकास आघाडी अधिक गतीने कार्यरत राहील , अशी टीका सातारा पालिकेचे उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कोणाचेही नाव न घेता केली आहे . याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की , कोरोनावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने सातारा पालिका सुरुवातीपासूनच कार्यरत आहे . खावली येथील विलगीकरण केंदामध्ये सर्व मुलभूत सेवा पालिकेमार्फत दिल्या जात आहेत . तसेच कात्रेवाडा शाळा येथील विलगीकरण केंद्राला पालिकेने सर्व मुलभूत सुविधा पुरविल्या आहेत . कोरोना मृतांचे अंत्यसंस्कार देखील पालिका स्वखर्चाने करीत आहे . लसीकरणासाठी लस उपलब्ध करुन घेवून कस्तुरबा प्राथमिक आरोग्य केंद्र , गोडोली आरोग्य केंद्र , शाहुपूरी ग्रामपंचायत इमारतीमधील लसीकरण केंद्र , शानभाग विद्यालय , श्रीपतराव पाटील हायस्कूल - करंजे , पिरवाडी , विलासपूर , विक्रांतनगर , चंदननगर , विशाल सह्याद्री शाळा शाहुनगर येथे लसीकरण केंद्र सुरु केली आहेत.
कोरोना प्रतिबंधासाठी पालिका विविध उपाय राबवित असल्यानेच पालिकेने स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरु केला नाही . त्यामुळे पालिकेचे अस्तित्व दिसत नाही अशी टीका करणे योग्य नाही . तरी सुध्दा केलेल्या टिकेचा सकारात्मकतेने विचार करुन , पालिकेमार्फत आणखी काही उपाययोजना गतीने राबविण्याकरीता सातारा विकास आघाडी कटीबध्द आहे . घंटागाड्यांच्या गाण्यांमुळे पालिकेचे अस्तित्व ज्यांनी मान्य केले , त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वच्छतेच्या बाबतीत नगरपरिषद सक्षमपणे काम करीत आहे , अशी एक प्रकारे कबुलीच दिली आहे असेच म्हणावे लागेल . कसेही असले तरी त्यांच्या टिकेतून आदरपूर्वक चांगले काम करण्याचा प्रयत्न खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या माध्यमातून केला जाईल , असेही मनोज शेंडे यांनी नमूद केले आहे .
सातारा विकास आघाडीच्या स्वच्छतेच्या कामाच्या निव्वळ गप्पाच: नगरसेवक अमोल मोहिते
खोटं आणि ते ही रेटून बोलण्यात माहीर असलेलेच सध्याच्या कोरोनाच्या साथीच्या काळात विलगीकरण केंद्र व लसीकरणाच्या कार्यक्रमात कसलेच योगदान नसताना जनतेची दिशाभूल करीत आहेत . विलगीकरण केंद्रासाठी शासनाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाचे जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी काम करीत आहेत . तर लसीकरण मोहीम राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राबवित आहे . असे असतानाही आम्हीच सर्वकाही करतो अशा फुशारक्या मारणा - या व सातारा विकास आघाडीच्या मार्गदर्शना खालील नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने जंतूनाशकाबरोबरच कोविड बाधीत मयतंच्या अंत्यसंस्कारासाठी कैलास स्मशानभूमीत रचण्यातआलेल्या सरणाच्या लाकडात किती मलीदा लाटला हे प्रसिध्दी माध्यमांनीच जगजाहीर केले आहे . एकदाची त्या जंतूनाशकाची तपासणी करा म्हणजे कुणाकुणाच्या पोटात मलिदयाचे किडे शिरलेत हे ही जनते समोर येईल .
नगर पालिकेत मर्जीतल्या ठेकेदारांनाच काम मिळावे यासाठी चार चार वेळा निविदा काढून केलेला निविदा कामातील भ्रष्टाचार तसेच नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष , सभापती यांच्यासह सातारा विकास आघाडीतील कोणाकोणाला किती टक्केवारी द्यावी लागते हे तुमचेच नगरसेवक वर्तमानपत्रातून जाहीररित्या आरोप करीत असतात . एकमेकांची उणीदुणी काढण्यात आघाडीवर असलेली सातारा विकास आघाडी असाच लौकिक तुम्ही .मिळवला आहे . कोटयावधीच्या विकास कामांच्या बढाया मारणा - यांनी हद्दवाढीत नव्याने समावेश झालेल्या भागासाठी किती निधी आणला हेही जाहीर करावे . भुयारी गटर योजनेतला बटयाबोळ , सोनगाव डेपोची दुरावस्था , घटांगाडीतला घपला आणि घंटागाडीवाल्याचा आत्महत्येचा प्रयत्न , सफाई कामगारांचे चार चार महिने रखडणारे पगार , प्रकाश योजने खालील बजेटचा भ्रष्टाचार , खुलेआम सुरू असलेले कमीशनराज आणि स्वच्छतेच्या नावाखाली नगरपालिकेच्याच तिजोरीची सुरू असलेली सफाई यातच गुरफटून समक्षतेचा डांगोरा पिटणा - यांनी विकासकामांच्या आणि पालिकेच्या सक्षमतेच्या वल्गना करू नये , असेही यावेळी मोहिते यांनी नमूद केले आहे .