खोपोलीतील ट्रॅफिक जॅम आणि उपाय
गुरुनाथ साठेलकर-खोपोली
खोपोली शहरात शीळफाट्यावर दर शनिवार आणि रविवारी ट्रॅफिक जॅम होत असायची किंबहुना होत आहे. मागच्या रविवारी शीळफाट्यावर खूप ट्रॅफिक झाली होती, त्यामुळे सोशल मीडिया वरती तो विषय रंगला होता.
त्यावर इलाज म्हणून आपण काहीतरी करावं या हेतूने, थोडे प्रॅक्टिकल होऊन अभ्यास केला असता, हे लक्षात आलं की शनिवार आणि रविवार हा लोणावळा, महाबळेश्वर अशा ठिकाणी जाणार्या पर्यटकांसाठी महत्वाचा दिवस असतो. तेथून रिटर्न होताना एक्सप्रेसवेवर मुंबईकडच्या लेनवर खालापूर टोल नाका येथे टोल भरण्यासाठी खूप मोठी लाईन लागते. अशावेळी लोणावळा येथून पास होताना, वाहन चालक जेंव्हा गुगल सर्च मारतो, त्यावेळेस टोल नाक्यावर ट्राफिक दिसते.
टोल नाक्यावर ट्राफिक दिसता क्षणी लोणावळा येथून खंडाळा मार्गे अंडा पॉईंट येथून लवकर मुंबईकडे पोहोचण्यासाठी वाहनचालक खोपोलीतून येत पनवेलच्या दिशेने जाणारा आडमार्ग निवडत असतात. त्यामूळे खोपोलीतील रेग्युलर वाहनात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची भर पडते आणि ट्रॅफिक जॅम होते.
जर खोपोलीतून Wrong Side ने उतरणाऱ्या वाहनांना डायव्हर्ट करण्यासाठी काल सायंकाळी एकटाच साधारणपणे एक तासभर, अंडा पॉईंटच्या जवळ जेथून खोपोलीकडे जातात त्या स्पॉटवर उभा राहिलो आणि खोपोलीच्या दिशेने आत वळणाऱ्या वाहन चालकांना थोडे पुढून पुन्हा एक्सप्रेस वरती जाण्याच्या सूचना केली. त्यामुळे खोपोलीत वळणाऱ्या गाड्यांची संख्या खूप कमी झाली हे लक्षात आले. रेग्युलर अश्याच पध्दतीने मुंबईकडे जाणारा पर्याय निवडणारे वाहन चालक माझी सूचना अमान्य करत "आम्हाला खोपोलीत जायचे आहे" असे सांगून उतरत होते. ज्यात T परमिट अर्थात पिवळ्या नंबर प्लेट लावलेल्या वाहनांचा भर जास्त होता.
शीळफाट्यावर ट्रॅफिकचा अंदाज घेतला असता, सायंकाळी कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक दिसली नाही. मात्र दरवेळी असे करणे शक्य होणार नाही. तरीही अशा पद्धतीने काहीतरी क्लुप्त्या काढून शीळफाट्यावर होणाऱ्या ट्रॅफिकला आपण रोखू शकतो. त्याच प्रमाणे शीळफाट्यावर थोडीशी ट्रॅफिकची शक्यता जाणवली तर आपण खोपोलीतल्या वाहनांना डीपी रस्ता, वासरंग, चिंचवली या मार्गे वळवू शकतो.
यावर आपण आता विचार करायला हवा. काल ट्रायल बेसिसवर कोणालाही न कळवता केलेला हा किंचितसा प्रयत्न सक्सेस झाला असे वाटते. दरवेळी तो तसा होऊ शकणार नाही हेही तितकेच खरे.